ततो युद्धाय युज्यस्व…

0
262
  • मीना समुद्र

कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार वृत्तीपायी त्याने स्वतःला संजीवन देणार्‍या निसर्गाची, श्‍वास देणार्‍या पर्यावरणाची, सदैव साथ देणार्‍या सृष्टीची अपरिमित हानी केली आहे.

आंघोळ, नाश्तापाणी झाल्यावर रोजच्यासारखे पिलोबा वरच्या मजल्यावरून खाली आमच्याकडे खेळायला आले. एरव्ही त्याला बाहेर झाडापानात, मातीत काम करायचं असतं. पण परवा धो-धो पाऊस, त्यामुळे घरातलीच खेळणी त्याच्यापुढे ठेवली. मग थोड्या वेळाने तिथलाच एक ‘डाऊन टू अर्थ’चा अंक उघडून त्यानं चित्रं बघायला सुरुवात केली आणि त्यातलं ‘कोरोना’चं चित्र मला दाखवलं आणि मग म्हणाला, ‘‘या कोरोनानं माझी वाट लावली…’’ ‘वाट लावली’ हे शब्द ऐकून मी उडालेच. मोठ्यांच्या तोंडूनच त्याने ऐकले असणार. मग सावरत त्याला विचारलं, ‘‘म्हणजे रे काय झालं?’’ तर म्हणाला, ‘‘मला बीचला जाता येत नाही, शाळेला जाता येत नाही, फ्रेंड खेळायला येत नाहीत.’’ नुकतेच पंख फुटून उडू पाहणार्‍या, शाळेची गोडी लागलेल्या अशा सार्‍याच पाखरांची आणि संपूर्ण मानवजातीचीच अशी वाट लागली आहे. मी मनात म्हटलं, या महामारीचा वीट आला आहे हे अगदी खरं असलं तरी माणूस अशा गोष्टीतूनही वाट काढतो आणि पुन्हा उभा राहतो हे मात्र खरं!
जगात अशा या महामारीचं हे पहिलंच उदाहरण नाही. भूकंप, पूर, वणवे, चक्रीवादळे, त्सुनामी, अवर्षण, अतिवर्षण… त्यामुळे सुका आणि ओला दुष्काळ यामुळेही प्रचंड प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. पहिल्या महायुद्धात जेवढी माणसे मारली गेली, त्याहीपेक्षा मोठ्या संख्येने १९१८-१९ च्या स्पॅनिश एन्फ्लुएंझामुळे ९ ते १० कोटीपर्यंत माणसे मृत्युमुखी पडली. त्या काळच्या जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात पाहता ही मनुष्यहानी जबरदस्त होती. प्लेगची साथही अशीच. त्यावेळी आताच्या मानाने दळणवळणाची साधनेही कमी होती. लोकांची जीवनशैलीही वेगळी होती. तरी त्यातून वाट काढत मानवजात खंबीरपणे उभी राहिली. काही जागतिक नैसर्गिक आपत्तींच्या तुलनेत आजही कोरोनामुळे लाखो-करोडोंच्या संख्येने माणसे मृत्युमुखी पडत आहेत. आजकाल दळणवळणाची साधने वाढली आहेत. आणि कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे.

स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार वृत्तीपायी त्याने स्वतःला संजीवन देणार्‍या निसर्गाची, श्‍वास देणार्‍या पर्यावरणाची, सदैव साथ देणार्‍या सृष्टीची अपरिमित हानी केली आहे. स्वार्थाने अंध होऊन स्वतःची आणि उमलत्या भावी पिढीची खरोखरच वाट लावली आहे. ‘अति तिथे माती’ म्हणतात ना तशी हसत्या-खेळत्या-चालत्या-बोलत्या जीवनाची माती करून टाकली आहे. त्याला खीळ घातली आहे. पर्यावरणतज्ज्ञ, समाजसेवी, निसर्गप्रेमी कानीकपाळी ओरडून, विनवून, कळवळून सांगत असूनही ज्या गोष्टीकडे आपण कानाडोळाच केला आणि बेपर्वाईने वागलो तीच बेपर्वाई आपल्या अंगाशी आली आहे, याची जाणीव आणि जाग माणसाला आत्ताकुठे थोडी थोडी येऊ लागली आहे. संयम हे साधू-संन्याशाचे काम नव्हे, ते सांसारिकाचे, जनसामान्यांचेही आहे. ही जबाबदारीची जाणीव माणसाला भानावर आणते.
कोरोनाबाबतीत स्पर्श, दळणवळण, संसर्ग टाळून स्वच्छता आणि मास्क, योग्य अंतरासारख्या खबरदारीच्या उपायानेच आपण सुरक्षित राहू शकतो हे कळते आहे. पण काही ठिकाणी वळत नाहीसे दिसते आहे.

अगदी सुरुवातीला चीनच्या कोरोनाच्या बातम्या ऐकत होतो. इतर देशांनाही त्याची लागण झाल्याचे ऐकले आणि आपल्या देशात असे संक्रमण टाळण्यासाठी टाळेबंदी जाहीर झाली तेव्हाही त्याची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात आले नाही. इकडून-तिकडून टाळेबंदीची कुणकुण लागली तेव्हा ८-१५ दिवसांची, तर कुणी महिनाभराची तरतूद धान्य-वस्तू वगैरेंच्या रूपात करून निर्धास्त झाले. मिळालेली सुट्टी ही इष्टापत्ती समजून कुणी भरपूर आराम केला. ताणविहरित झोपा काढल्या. कुटुंबीयांसमवेत राहण्याची अशी सुवर्णसंधीच ती कुणाला वाटली. गप्पागोष्टी, पत्त्यांचे डाव, कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, ठिकरी, गजगे (सागरगोटे), रांगोळ्या, चित्रे, फोटो पाहणे, जुन्या आठवणीत रंगून स्मरणरंजन झाले. स्वयंपाकात कधीही लक्ष न घालणारे पुरुष हौसेहौसेने स्वयंपाक शिकले. कामवाल्या नाहीत तर केरकचरा, धुणीभांडी, घराची साफसफाई यातही लक्ष घालूू लागले. आयांना तान्हुल्यांबरोबर आणि बछड्यांबरोबर मनसोक्त वेळ मिळाला. सुट्टी असून कुठे जाता येत नाही, कुणाला भेटता येत नाही हे मात्र पहिली सुखद लाट ओसरल्यावर लक्षात आले. माणूस हा समाजशीलच प्राणी, त्यामुळे मग नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रांची आठवण त्याला बेचैन करू लागली. कारण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे टाळेबंदी मारुतीच्या शेपटासारखी वाढता वाढता वाढतच राहिली.

दुःखात सुख एवढेच की मोबाईल, फोन, टीव्हीचे कार्यक्रम हे सारे चालू होते. रामायण, महाभारतासारख्या जुन्या मालिका, ‘सह्याद्रीच्या पाऊलखुणा’मधले दिग्गज, लेखक, चित्रकार, कलाकारांचे अनेक कार्यक्रम पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेले. जुनी पत्रे काढून वाचन झाले. जुने फोटो काढून आठवणीही जाग्या झाल्या आणि पाठवून त्या जाग्या केल्या गेल्या. ते ते प्रसंग आठवून त्यात मुशाफिरी केली गेली. चित्रे, रांगोळ्या, नृत्य, हस्तकला असे नाना प्रकारचे व्हीडीओ पाठविण्याची जणू चढाओढ लागली. कोडी, कथा, कविता, म्हणी यांना बहर आला. भाषणं, चित्रपट, मिटिंग, नाटकंही मोबाईलवर, यूट्यूबवर मनोरंजन करू लागली. सभासंमेलने, नाटकं, सिनेमांना जमणार्‍या समाजात जे चैतन्य खेळते, सहवासाचा आनंद मिळतो त्याचा मात्र सर्वत्र अभाव होता. डॉक्टर, पोलीस, सेवाक्षेत्रातले सर्वजण, स्वच्छता कामगार यांना अहोरात्र कर्तव्य बजावावे लागले. त्यांच्याबद्दल लोकांत आदराची भावना निर्माण झाली. तरीही परिचितांचे मृत्यू, त्यांचे अंत्यदर्शनही घेता येऊ नये असा दैवदुर्विलास काहींच्या वाट्याला आला. मग ते आईवडील असोत, भाऊबहीण वा काका-मामा कुणीही असोत. दूरदेशात राहणार्‍यांची तर बातच अलग. घरून काम आणि बाकीचा वेळ फक्त एकदोघांनीच व्यतीत करायचा. संपर्काचं साधन फक्त व्ही.डी.ओ. कॉल. कोरोनाने या आभासी दुनियेची सफर मात्र सातत्याने घडवून आणली आणि आणत आहे. लॉकडाऊन कंटेन्मेंट झोन, सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर असे शब्द अगदी सर्वसामान्यांच्या, अशिक्षितांच्याही ओठांवर खेळू लागले. सातत्याने योगासने, व्यायाम, गरम पाणी, दूध-हळद, काढा आणि चौरस आराहाच्या सहाय्याने प्रतिकारशक्ती अंगी बाणवण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि मार्गदर्शन सुरू झाले. आर्थिक घडी बसविण्याची धडपडही सुरू झाली. यासाठी आवक-जावक आलीच.

आज जागतिक पर्यटनदिन. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे, प्रत्येकाच्या मनात खोलवर एक ‘जिप्सी’, एक भटक्या, एक प्रवासी दडून असतो. भटकंतीची आवड असल्याने नोकरीतून, कामाधामातून, संसाराच्या असंख्य कटकटीतून, अडचणीतून तो मार्ग काढतो आणि मुक्तपणे आधीव्याधी, सारे व्यापताप विसरण्यासाठी तो जवळ वा दूर भटकायला निघतो. मग ते निसर्गरम्य ठिकाण असेल, ताजमहालासारखी कलाकृती असेल, एखाद्या लेखकाचे गाव असेल किंवा ऐतिहासिक स्थळ असेल. या यंत्रतंत्र युगात पर्यटन अतिशय सोपे, सहजसुलभ, सोयींनी युक्त झाले आहे.

यंदा मात्र एरव्हीच्या मुक्तपणाला ‘पण’ लागलेला आहे. पर्यटनाची स्थाने अनंत आहेत, पण कोरोनामुळे बाहेर पडणे जरी आता शक्य असले तरी योग्य ती सर्व पथ्ये पाळून, अस्वच्छता, अधीरता, असंयम, अहंगंड, अनादर, बेपर्वा वृत्ती टाळून स्वतःला आणि इतरांना सुरक्षित राखणे हे सर्वकालीन असे आपले आद्य कर्तव्य मानून वागायला हवे. सकारात्मकतेने विचार करीत नैराश्य, दुःश्‍चित्ताचे सावट दूर करायला हवे. ही एक लढाईच आहे, त्यासाठी निर्भर बनून ‘ततो युद्धाय युज्यस्व’ हा कौंतेय अर्जुनाला केलेला भगवान श्रीकृष्णाचा संदेश, आदेश, उपदेश ध्यानी धरायला हवा.