- दिलीप वसंत बेतकेकर
‘छडी वाजे छम्छम् विद्या येई घम्घम्’, हा काळ आता खूपच मागे पडला आहे. केवळ छडीच्या वापरानेच विद्या चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकत नाही हे समजून घ्यायला हवं. समस्येच्या मूळाशी गेल्याशिवाय निदानही होणार नाही आणि उपचारही शक्य नाही.
वादळ दिसत नाही, वादळाचे परिणाम दिसतात, असं म्हणतात.
मुलं नापास झाली, कमी गुण मिळाले हे दिसतं. पण बहुतेक वेळा नापास होण्यामागची नेमकी कारणं दिसत नाहीत, जाणवत नाहीत. आणि त्याहीपेक्षा ती जाणून घेतली जात नाहीत. किंवा खूप जणांच्या बाबतीत ही कारणं कशी समजून घ्यायची हे माहीत नसतं.
याला फक्त पालक किंवा मुलं जबाबदार असं म्हणता येणार नाही.
योग्य माहितीचा अभाव हे मुख्य कारण.
या कामात आपल्याला कोणाची मदत होऊ शकते याची चर्चा या लेखात आपण करणार आहोत.
सुदैवाने आज विविध प्रकारचे तज्ज्ञ (एक्स्पर्ट) उपलब्ध आहेत.
वर्गातील शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसण्याचे एक व एकच कारण असत नाही. तसंच सर्व मुलांच्या शैक्षणिक मागासलेपणाचं कारणही एकच असत नाही. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात.
पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व न मिळणं हे एक कारण आहे. व्हिटॅमिन तसेच अन्य अनेक धातू (मिनरल्स) जर योग्य प्रमाणात मिळाले नाहीत तर गडबड होते. काहींना आर्थिक स्थितीमुळे पूर्ण आहार मिळत नाही व मुलांचं कूपोषण होतं. दुसर्या बाजूला चांगल्या सधन घरांतही फास्टफूड, जंकफूड व नको तेवढं खाऊनही कूपोषणासारखीच स्थिती येते. आहारतज्ज्ञांच्या मदतीने नेमकं काय, किती आणि केव्हा खावं याचं मार्गदर्शन मिळू शकतं. चांगल्या पोषक आहारासाठी फक्त भरपूर पैसेच हवेत असं नाही. योग्य माहितीही हवी.
कितीतरी लोकांना ऍलर्जी असते. खूपदा नेमक्या ऍलर्जीचा थांगपत्ताच लागत नाही. कुणाला धुळीची, तर कोणाला आणखी कशाचीतरी ऍलर्जी असते. जोपर्यंत नेमकी कशाची ऍलर्जी हे कळत नाही तोपर्यंत अंधारात चाचपडणंच असतं. ऍलर्जीचा नेमका प्रकार व कारणं शोधून काढणारे तज्ज्ञ आहेत. त्यांना ऍलर्जीस्ट म्हणतात.
अनेक सुशिक्षित आणि सधन पालकांनाही मुलांच्या नेमक्या समस्या जाणवत नाही. एखाद्या मुलाला ऐकण्याची- श्रवणाची समस्या असते. नाक- कान- घशाचा डॉक्टर असतोच. पण नेमका श्रवणदोष शोधणारा विशेषज्ज्ञ (ऑडिऑलॉजिस्ट) असतो, त्याची मदत घेता येते.
सध्या दूरदर्शन, व्हिडिओगेम्स आणि मोबाईलमुळे घराघरात डोळ्यांचे विचित्र विकार दिसतात. डोळ्यांचे व्यायाम (थेरपी) शिकवले जातात. प्रशिक्षण दिलं जातं. डेव्हलपमेंटल ऑप्टीमेट्रिस्ट दृष्टी तपासायला सहाय्य करतो.
डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट चाचणी करून नेमक्या शैक्षणिक समस्या शोधून काढायला मदत करतो.
ऑप्टोमेट्रिस्टसारखाच डोळ्यांच्या समस्यांसाठी मार्गदर्शक आहे ऑफ्थॉल्मॉलॉजिस्ट.
फिजिकल थेरपिस्टच्या सल्ल्याने मसाज आणि अन्य व्यायामप्रकार निश्चित करून त्याचा सराव व पाठपुरावा केला जातो.
मुलांच्या नेमक्या शैक्षणिक समस्या कोणत्या व कोणत्या संकल्पना मुलांना न समजल्यामुळे पुढची प्रगती समाधानकारक होत नाही यासाठी काही निदानात्मक चाचण्या (डायाग्नोस्टिक टेस्ट्स) असतात. सायकोमेट्रिस्ट हे नेमकेपणाने शोधून काढून आपल्याला मदत करू शकतो.
पिडियाट्रिक न्युरॉलॉजिस्ट लहान मुलांमधील मज्जासंस्थांमुळे निर्माण झालेले दोष लक्षात आणून देतो.
बोलण्यातही अनेक प्रकारचे दोष (वाचादोष) असतात. भाषा, वाणी, आवाज, उच्चारण असे सूक्ष्म भेद असलेले अनेक दोष असतात. सामान्य माणसाला त्यातले बारकावे, सूक्ष्म भेद कळत नाहीत. त्याच्या दृष्टीने सर्व दोष एकच किंवा सारखेच. पण तज्ज्ञच त्यासंबंधी नेमकं व अचूक मार्गदर्शन करू शकतात. या कामी स्पीच-लँग्वेज थेरपीस्ट्सची मदत घ्यायला हवी.
सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट हे एकच नव्हेत. त्यात अंतर आहे. त्यांची कामंही वेगवेगळी. यांची नावं जरी उच्चारली तरी पालकांना अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं. गोव्यात सर्व शाळातील काही कारणांमुळे अभ्यासात मागे पडणार्या मुलांची चाचणी करून त्यांच्यासाठी विशेष शिक्षकांची व स्वतंत्र खोलीचीही (रिसोर्स रूम) व्यवस्था केली आहे. पण त्यासाठी एक चाचणी आहे. ती चाचणी करण्यासाठी पालकांचं संमतीपत्र लागतं. पण खूप पालक गैरसमजामुळे हे संमतीपत्र द्यायला तयारच होत नाहीत. परिणामतः या विशेष सोयीचा, व्यवस्थेचा व तज्ज्ञांचा ह्या मुलांना लाभ मिळत नाही.
अनेक मुलांच्या बाबतीत कर्मेंद्रियांचा समन्वय ठीक नाही (फाइन मोटर अँड को-ऑर्डिनेशन प्रॉब्लेम) असं दिसतं. त्यासाठी मदत करणारा ऑक्युपेशनल थेरपीस्ट असतो. याशिवाय अनेक तज्ज्ञ, विशेषज्ज्ञ (थेरपीस्ट) आहेत.
हे सगळे दोष आपल्या मुलामध्ये आहेत असं समजून संशयाने व भीतीने गांगरून जाण्याची आवश्यकता नाही. आणि दोष असले तर लोकांपासून लपवण्यासाठी तज्ज्ञांकडे जायचंच नाही हे दोन्ही टोकाचे मार्ग टाळा आणि मुलांना सांभाळा.
‘ऍक्युरेट डायाग्नोसिस इज हाफ द क्युअर’.
कोणत्याही आजाराचं अचूक निदान होण्यासाठी काही चाचण्या असतात. सध्या वैद्यकशास्त्रात अशा विविध प्रकारच्या चाचण्या (टेस्ट) आहेत. त्यामुळे नेमकेपणानं औषधोपचार करता येतात. रक्त, मल, मूत्र तपासून निष्कर्षापर्यंत पोचता येतं. एक्स रे, ईसीजी, ईईजी, एम.आर.आय. इ. अनेक चाचण्यांनी डॉक्टर व रुग्णांना खूप दिलासा मिळाला आहे. एखाद्या डॉक्टरने अमुक अमुक टेस्ट्स करून रिपोर्ट आणायला सांगितलं की रुग्ण त्या सगळ्या चाचण्या करतो. रुग्णाकडे बघण्याचा घरातील माणसं आणि नातेवाईकांचा दृष्टीकोनही सहानुभुतूपूर्णच असतो. रुग्णाची कोणीही उपेक्षा करत नाही, कोणी रागावत नाही, चेष्टा करत नाहीत.
पण मुलगा नापास झाला, कमी गुण मिळाले की घरातील मंडळींचा व्यवहार कसा असतो? कमी गुण मिळणं, अभ्यास न होणं, नापास होणं, विषय कठीण वाटणं यालाही आजार मानायला काय हरकत आहे? नुसतं रागावणं, ओरडणं, मारणं, शिव्या देण्यानं मूळ समस्या सुटत नाही. आपल्या घरातील आजारी माणसाकडे आपण ज्या दृष्टीनं बघतो व तो बरा व्हावा म्हणून जे करतो तेच अभ्यासात मागे पडणार्या मुलांच्या बाबतीतही करायला हवं. ‘छडी वाजे छम्छम् विद्या येई घम्घम्’, हा काळ आता खूपच मागे पडला आहे. केवळ छडीच्या वापरानेच विद्या चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकत नाही हे समजून घ्यायला हवं. समस्येच्या मूळाशी गेल्याशिवाय निदानही होणार नाही आणि उपचारही शक्य नाही.