तगडी झुंज

0
18

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील सलग दहा सामने दमदारपणे जिंकून भारतीय पुरुष क्रिकेट संघ आता उद्या रविवारी आपल्या तिसऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाशी झुंजणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हा तब्बल पाचवेळा विश्वचषकावर मुद्रा कोरणारा आणि सहाव्याची आकांक्षा बाळगणारा तगडा संघ आहे हे विसरून चालणार नाही, परंतु भारताची आजवरची ह्या स्पर्धेतील दणदणीत कामगिरी, फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्ही बाबतींत आजवर दिसलेली चमक आणि यजमानपद भूषवित असल्याने संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अहमदाबादेत जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमवर उसळणार असलेली लाखोंची गर्दी ह्यामुळे भारत यावेळी इतिहास रचू शकेल अशी तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. न्यूझीलंडवर 2019 मधील पराभवाचे उपांत्य सामन्यात उट्टे काढून भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला आहे. या स्पर्धेतील त्याचा प्रवास खरोखरच नेत्रदीपक आणि स्पृहणीय झाला. ह्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियालाच दणका दिला आणि सहा गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाने आजवर मागे वळून पाहिलेले नाही. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर आठ गडी राखून, नंतर पाकिस्तानवर आणि बांगलादेशवर प्रत्येकी सात गडी राखून, न्यूझीलंडवर चार गडी राखून, इंग्लंडवर 100 धावांनी, श्रीलंकेवर तब्बल 302 आणि दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी आणि शेवटी नेदरलँडवर 160 धावांनी भव्यदिव्य विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघ येथवर येऊन पोहोचलेला आहे.
एकीकडे कप्तान रोहित शर्मा, विक्रमवीर विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल यांची दमदार फलंदाजी, दुसरीकडे महंमद शामी, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांची नेत्रदीपक गोलंदाजी या दुहेरी कामगिरीतून भारताने चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यांच्या वैयक्तिक कामगिरीत थोडेफार चढउतार सामनापरत्वे आलेही असतील, परंतु तरीही ह्या अंतिम सामन्यावर नाममुद्रा उमटवण्याची संधी ते वाया घालवणार नाहीत अशी आशा आहे. विश्वचषकावर आपले नाव कोरण्याची पहिली संधी भारताला 1983 साली मिळाली. तत्पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धांत सहाव्या, सातव्या स्थानावर राहणाऱ्या भारतीय संघाने कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वाखाली 83 च्या त्या विश्वचषकावर नाव कोरून इतिहास घडवला. दोनवेळचे चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजवर तेव्हा भारतीय संघाने मात केली होती आणि विश्वचषक स्पर्धेतील पहिला पराभव त्यांना चाखायला लावला होता. मोहिंदर अमरनाथ आणि मदनलालने घेतलेले प्रत्येकी तीन बळी तेव्हा भारताला विश्वचषकापर्यंत घेऊन गेले होते. लॉर्डस्‌‍ मैदानावरचा तो जल्लोष आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मृतींत कायम आहे. त्यानंतर भारताला विश्वचषक हाती यायला 2011 साल उजाडावे लागले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना तो क्षण पुन्हा अनुभवायला दिला. शून्यावर बाद झालेला सेहवाग, अठरावर बाद झालेला सचिन यांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला असताना गौतम गंभीरच्या 97, विराटच्या 35 आणि स्वतः धोनीच्या नाबाद 91 धावांनी श्रीलंकेला पराजित करून भारताने तो विश्वचषक झोळीत टाकला होता. कुलशेखरच्या चेंडूवर धोनीने तेव्हा फटकावलेला तो विजयी षटकारही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायम आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपली नाममुद्रा कोरण्यासाठी कोण आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवणार त्याबाबत निश्चितच उत्सुकता आहे. फलंदाजांच्या बॅटी तर तळपत आहेतच, परंतु भारतीय गोलंदाजीची कमाल यावेळी दिसली आहे. 1983 आणि 2011 च्या दरम्यानच्या काळात 2003 साली भारताला चालून आलेली संधी ऑस्ट्रेलियानेच भारताकडून हिरावून घेतली होती. केवळ दोन बाद 359 ची विराट धावसंख्या तेव्हा ऑस्ट्रेलियाने जोहान्सबर्गमध्ये रचून ठेवली होती, जी भारताला पार करता आली नव्हती. या विश्वचषक स्पर्धेमध्ये निघणारे षटकार, चौकार आणि धुंवाधार फलंदाजी पाहता यावेळी भारतीय संघ मुळीच कमी पडणार नाही असा विश्वास चाहत्यांना आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला, परंतु एकतर्फी दिसणाऱ्या त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला शेवटी शेवटी बरेच झुंजवले हेही तितकेच खरे. वानखेडेवर ग्लेन मॅक्सवेलच्या अंगात संचारलेले वारे दक्षिण आफ्रिकेने उपांत्य सामन्यात पार उतरवले आहे. त्यामुळे भारत निर्धास्तपणे आणि प्रखर जिद्दीनिशी अंतिम सामन्यात उतरेल आणि तिसऱ्यांदा त्यावर नाव कोरील अशी आशा बाळगूया!