तक्रारीनंतर ७२ तासांत खड्डा बुजवणार

0
13

>> सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा दावा

राज्यातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यात वाहनचालक, नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांवरील खड्‌ड्याची माहिती मिळविण्यासाठी ऍपचा वापर केला जाणार असून, या ऍपवर तक्रार आल्यानंतर ७२ तासांत खड्डा बुजविण्यात येणार आहे, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केला.

रस्त्यावरील खड्डे बुजवणार्‍या जेट पॅचर मशीनचे नीलेश काब्राल यांच्या हस्ते काल ताळगाव येथे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

पावसाळ्यात खड्डे बुजविणारी दोन यंत्रे भाडेपट्टीवर घेण्यात आली आहे. सरकारने यंत्राची खरेदी केलेली नाही. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी यंत्राचा वापर केला जाणार आहे. कंपनीने खड्‌ड्यांच्या दुरुस्तीची १८ महिन्याची हमी दिली आहे. देशातील इतर भागांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. या यंत्राच्या माध्यमातून केलेल्या खड्‌ड्याच्या दुरुस्तीचा वेळोवेळी आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले. रस्त्यावरील खड्‌ड्यांची माहिती ऍपद्वारे उपलब्ध होईल आणि ऍपवर तक्रार आल्यानंतर ७२ तासांत खड्डा बुजवला जाईल. सुरुवातीला हे ऍप बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यापुरते मर्यादित ठेवले जाणार आहे. दोन महिन्यानंतर नागरिकांसाठी ते खुले केले जाणार आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.

ताळगाव येथे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात व इतरांची उपस्थिती होती.