तंत्रज्ञानाच्या युगात हरवलेले बालपण

0
26
  • पल्लवी उल्हास घाडी
    (तृतीय वर्ष, कला शाखा,
    गणपत पार्सेकर शिक्षण महाविद्यालय, हरमल)

‘का कळेना अशी हरवली पाखरे…’ ही ओळ आजच्या युगात सार्थ ठरते. आम्ही आमच्या लहानपणी घालवलेले बालपण म्हणजे लगोरी, पकडा-पकडी, डोंगर की पाणी, तर कधी मातीत खेळणं. शाळेतून येताच दप्तर घरात ठेवून, आईने वाढलेले पान संपवून लगेच अभ्यास संपवायचा, व मग आम्ही खेळायला पळायचो. त्यावेळीची उमेदच वेगळी होती.

पण आता काळाबरोबर चक्क पाने पालटली गेली. प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल फोन पाहायला मिळतो. क्वचितच कुठेतरी मुले खेळताना आढळतात. आज जर मूल मातीत खेळायचा हट्ट करू लागले तर पालक त्याला ‘ॲलर्जी’ होईल म्हणून सांगतात. मुलं जेवत नाहीत म्हणून आई मुलाच्या समोर मोबाईल आणून ठेवते. मग त्या मुलाचे वय 2-3 वर्षे का असेना. अशाप्रकारे कुठेतरी पालकच मुलांना लहानपणी ही सवय लावत जातात आणि मुलं शाळेत जाऊ लागली की तक्रार शिक्षकांकडे करतात. “बाई! मुलं अभ्यास कमी आणि फोन जास्त वापरतात.” यात सवय पालकांनी केलेली असते, पण दोष मात्र मुलांचाच. का? तर ती फोनसाठी हट्ट करतात म्हणून!

हल्लीच 3-4 वर्षांपूर्वी ‘कोरोना’ने संपूर्ण जगाला वेढा घातला आणि शिक्षण ऑनलाइन करण्यात आले. मात्र अशा काळात गरज भासू लागली ती लॅपटॉप, स्मार्टफोन, आयपॅड यांसारख्या साधनांची. आणि हळूहळू मोबाईलचा अतिवापर मुले करू लागली. गेमिंग, सोशल मीडियासारख्या प्लेटफॉर्मवर आपला वेळ घालवू लागली.
आज मैदानी खेळ आणि शारीरिक हालचाली कमी होत असल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक कौशल्यावर परिणाम होताना दिसून येतो. त्याचबरोबर शैक्षणिक कामगिरी आणि सर्जनशीलतेवर परिणाम जाणवतो. म्हणूनच आज संतुलित बालपणाला प्रोत्साहन देणे ही पालक तसेच शिक्षकांची भूमिका अनिवार्य ठरते.