भाजपचे आमदार किरण कांदोळकर यांची मागणी
भाजप आणि मगो पक्षाच्या युती सरकारमध्ये मंत्री असलेले मगोचे आमदार सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर या दोघांनाही मंत्रीपदावरून काढून टाकावे, अशी मागणी थिवी मतदारसंघाचे आमदार किरण कांदोळकर यांनी काल केली.राज्यातील पाणी प्रकल्पावर तसेच खात्यातील इतर विभागात आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या मतदारसंघातील फोंडा, बांदिवडे त्याचप्रमाणे इतर मतदारसंघातील सुमारे ७०० युवकांची २०१२ पासून भरती केली आहे. तसेच अस्नोडा येथील पाणी प्रकल्पावर सुमारे ३५ कामगारांना सामावून घेतले आहे. पण आपल्या मतदारसंघातील बेकार युवकांना भरतीवेळी डावलण्यात आल्याचा आरोप कांदोळकर यांनी केला.
काल सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत सुमारे २०० हून अधिक लोकांनी अस्नोडा नागरिक समितीच्या झेंड्याखाली अस्नोडा पाणी पुरवठा प्रकल्पाजवळ मोर्चा काढला. त्यावेळी मोर्चेकरांनी स्थानिक आमदार किरण कांदोळकर यांना जबरदस्तीने त्याठिकाणी बोलावून घेऊन मंत्री सुदिन ढवळीकर यांनाही बोलावण्यास सांगितले. पण ते आले नाहीत. साबांखाचे अभियंते, बार्देश तालुका मामलेदार, सहाय्यक मामलेदार पाणीपुरवठा प्रकल्पाजवळ उपस्थित होते. यावेळी म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, उपनिरीक्षक सपना गावस व सुमारे ५० हून अधिक पोलीस चोख बंदोबस्त ठेवून होते.
यावेळी जमलेल्या पुरूष व महिलांनी मंत्री ढवळीकर यांच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. स्थानिकांना नोकर्यात प्राधान्य द्या, मंत्री ढवळीकर यांना भाजप सरकारमधून बाहेर काढा. अशी मागणी मोर्चेकरी करीत होते.
यावेळी मोर्चेकरी लोकांसमोर बोलताना आमदार कांदोळकर म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्यानेआतापर्यंत अनेक युवकांना कंत्राटपद्धतीवरही कामावर घेतले आहे. सोसायटीमध्ये घेतले नाही, त्यांना सोसायटीमध्ये घ्या अशी मागणी केली. या खात्याचे मंत्री ढवळीकर यांनी येथील युवकांना डावलून आपल्या मतदारसंघावर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन्ही ढवळीकर बंधूंना मंत्रीपदावरून त्वरित काढून टाकावे अशी मागणी आमदार कांदोळकर यांनी केली. यावेळी अस्नोडा पंचायतच्या सरपंच सपना मापारी, शिरसईच्या माजी सरपंच दीक्षा कांदोळकर, पंच संदीप कवठणकर, पंच अर्जुन कौठणकर, शिरसई सरपंच आनंद तेमकर, पीर्ण सरपंच गोविंद कुबल, रेवोडा सरपंच सदानंद बागकर तसेच ब्रिदेन केसरकर, सावियो आदीविदो, फ्रान्सिस डिसोझा, मधुरा मांद्रेकर, पार्वती गावस, सतीश हरमलकर, मेघःश्याम चोडणकर, रितेश वारखंडकर, दत्ता रेडकर, गोपाळ नाईक यांनीही साबांखा मंत्र्यांचा निषेध केला.