– वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर, ऍस्पिरीनच्या निरनिराळ्या ब्रँडच्या नावाने विकल्या जाणार्या गोळ्या घेणे हे दुसर्या रोगाला आमंत्रण देणे आहे.
कारणे –
१) पित्त वाढविणारा आहार-विहार
२) जागरण, उशीरा झोपणे
३) उन्हात हिंडताना डोक्यावर टोपी नसणे
४) उन्हातान्हात हिंडणे, ऊन सहन न होणे
५) पावसाळ्यात भिजणे
६) ताप, सर्दी, पडसे होणे, शौचास वा लघवीस साफ न होणे, शौचास खडा होणे, नाक बंद होणे, मानेचे विकार.
७) दृष्टी क्षीण असूनही योग्य चष्मा न घालणे, टक लावून पाहणे
८) वेळेवर न जेवणे, उपाशी राहणे, पोटभर न जेवणे, शिळे अन्न, थंड पदार्थ खाणे.
लक्षणे –
* डोकेदुखी, * डोके जड होणे, * डोके बधीर होणे, * कपाळ दुखणे,
* डोक्याचा मागील भाग दुखणे, * नाक बंद होणे, चोंदणे, * डोके तापणे, * डोळ्यांची आग होणे, * डोक्याला मुंग्या येणे, * चक्कर, भोवळ येणे * झोप न लागणे.
शरीर परिक्षण –
डोक्याचा कोणता भाग दुखतो, कोणता भाग गरम होतो हे लेप किंवा नस्य करण्याच्या उपचाराकरिता कळणे आवश्यक आहे. जिभेच्या परिक्षणावरून कृमी, मलावरोध याचे ज्ञान होते. डोळे तपासून शीरीरातील वाढलेल्या उष्णतेची पातळी लक्षात येते. नाक, घसा, तपासल्यामुळे सर्दी, पडसे व कफ याची कल्पना येते. एकूण झोप व विश्रांती यांचा अभाव लक्षात येतो.
अनुभविक उपचार –
अ) वातप्रधान शीर-शुळ ः
१. वेळेवर जेवण, पुरेशी झोप व आवश्यक ती विश्रांती.
२. ब्राह्मीवटी तीन गोळ्या दोन वेळेला सकाळी ८ व संध्याकाळी ६ वाजता घेणे.
३. निद्राकरवटी रात्रौ सहा गोळ्या झोपताना एक कप दुधाबरोबर घेणे.
४. पोट साफ नसल्यास एक चमचा गंहरितकी रात्रौ गरम पाण्यासोबत घेणे.
५. स्पॉंडिलायसीस त्रास असल्यास लक्षादी गुग्गुळ सकाळ/सायंकाळी तीन-तीन गोळ्या घेणे.
ब) पित्तप्रधान शीर-शुळ ः
१. उन्हात न जाणे
२. जागरण आणि विचार, रात्रौ उपवास टाळणे
३. तिखट, आंबट, खारट पदार्थ, चहा वर्ज्य.
४. लघुसुतशेखर व आरोग्यवर्धिनी गोळ्या सकाळी आठ व संध्याकाळी सहा वाजता घेणे.
५. आम्लपित्ताचा त्रास असल्यास आम्लपित्तवटी जेवणानंतर तीन गोळ्या घेणे.
६. झोपताना एक कप दुधात एक चमचा तूप घालून घेणे.
७. पोट साफ नसल्यास एक चमचा त्रिफळा चूर्ण रात्रौ गरम पाण्यासोबत घेणे.
८. नाकाद्वारे चांगल्या तुपाचे दोन थेंब सोडावे.
क) कफप्रधान शीर-शुळ ः
१. कफप्रधान पदार्थ उदा. केळ, दही, मासे, मीठ, आईसक्रीम, थंड पाणी टाळावे.
२. रिकाम्या पोटी सकाळी आठ व सायंकाळी सहा वाजता आरोग्यवर्धिनी तीन-तीन गोळ्या घेणे.
३. सर्दी-ताप असल्यास ज्वरांकुश व लक्ष्मीनारायण यांच्या तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात.
४. दोन्ही जेवणानंतर कुमारी आसव सातापा काढा, फळत्रिकादी काढा ४ चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.
पथ्यापथ्य –
१. लोणचे, मिरची, तिखट, मसालेदार पदार्थ, चहाचा अतिरेक टाळावा. सिगारेट, तंबाखू टाळावे.
२. नाक, कपाळ, डोके या भागात कफ, सर्दी साचू नये याची काळजी घ्यावी.
३. टोमॅटो, केळी, कलिंगड असे सर्दी, कफ वाढविणारे पदार्थ टाळावेत.
४. वेळेवर जेवण करावे, लवकर झोपावे.
५. उष्णतेमुळे उष्ण पदार्थांच्या अतिरेकामुळे, अतिजागरण, उन्हात हिंडणे यामुळे डोकेदुखी होऊ नये याची काळजी घ्यावी.