येथून जवळ असलेल्या मालण गावावर डोंगरकडा कोसळून २५ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर सुमारे १६० पेक्षा जास्त जण ढीगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दुर्घटना इतकी भीषण होती की, सुमारे ७० घरांचा हा गाव, त्यापैकी अवघी चार-पाच बांधकामे सोडल्यास पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांत १५ महिलांचा व पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, घटनास्थळी मदतकार्य वेगात सुरू असले तरी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अडचणी उभ्या राहत आहेत. साचलेल्या चिखलामुळे तसेच पाण्याचा प्रवाह सारखी माती खाली आणत असल्याने शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत आहेत.
दरम्यान, माती, दगडांचा खच यांच्यात अडकलेल्या लोकांचा शोध सध्या सुमारे ३०० जण घेत असून यात राष्ट्रीय आपत्ती निवारण फौज, महाराष्ट्र आपत्ती निवारण फौज, पोलीस, गावकरी, राजकीय कायकर्ते यांचा समावेश आहे.
मदतकार्यासाठी पुण्याहून लष्कराचे पथकही पाठविण्यात आले आहे. पुण्याच्या ससून इस्पितळात एक संपूर्ण वॉर्ड रिकामी ठेवण्यात आला असून ५० रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून नजीकच्या परिसरातील सुमारे अर्धा डझन गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
मालीण गाव हा १२ ज्योतिर्लिंगापैकी एक समजल्या जाणार्या ‘भिमा शंकर’ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी जंगलाने वेढलेल्या या गावात सुमारे ७५० वस्ती आहे. डिंभे धरण बांधल्यानंतर पुनर्वसनातून हा गाव उभारला गेला होता. येथील बहूतेक लोक हे शेतकरी आहेत. ढीगार्याखाली बरेच जणअडकले असल्याने मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकरराव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करून गृहमंत्री राजनाथ सिंग यांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. त्याप्रमाणे आज सिंग भेट देण्याची अपेक्षा आहे.
दुर्घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी विनोद पवार यांनी सांगितले की, आंबेगाव तालुक्यातील या गावात अविरत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराची माती भुसभुशीत बनली व त्यामुळे त्यात अडकलेली पाषाणे व इतर दगड सुटून खाली आले.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई ते नाशिक दरम्यानच्या रुळांवर तसेच ठाणे येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
एसटी चालकामुळे प्रकार उघडकीस
हा रोजचा मार्ग असलेल्या एसटी चालकाला गाव गायब झालेला दिसल्याने हा प्रकार काल सकाळी सर्वप्रथम उघडकीस आला. त्याच्या सवयीच्या स्टॉपकडे आल्यानंतर गाव दिसेनासा झाला व त्यामुळे दुर्घटनेची माहिती समोर आली.