म्हादई, कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कॅसिनो या मुख्य मुद्यांवरून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारकडून डॉ. जॅक सिकेरांचा पुतळा उभारण्याचे नियोजनबध्द नाटक रचण्यात आले आहे, अशी टिका कॉँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
राज्यातील आघाडी सरकारचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते व मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडून सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली जाते. आघाडी सरकारमधील मगोपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून पुतळा उभारण्याला विरोध केला जातो. तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून पुतळा उभारण्याबाबत थेट प्रतिक्रिया व्यक्त न होता विधानसभेच्या सभापतींकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. आघाडी सरकार जनमत कौलदिन साजरा करण्याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जनमतकौल दिन वर्षभर अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. या संबंधीची फाईल कित्येक महिने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या कार्यालयात पडून होती. लोकांत गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. जनसंघ, आरएसएस विलिनिकरणाच्याबाजूने होते. त्यामुळे भाजपला जनमत कौलदिन साजरा करण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपने तमाम गोमंतकीय जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही चोडणकर यांनी सांगितले. सरकारने हुकुमशाही पध्दतीचे वर्तन करू नये. राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या संपाच्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढावा. टूरिस्ट टॅक्सी मालकांना विश्वासात घेऊन गतिनियंत्रक व इतर विषयांवर निर्णय घ्यावा, असेही चोडणकर यांनी सांगितले.