राज्यातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचबरोबरच, अमलीपदार्थ व इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षेवर भर देण्यासाठी रणनीती तयार केली जाणार आहे, असे काल राज्याचे नवे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येथील पोलीस मुख्यालयात डॉ. सिंग यांनी पोलीस महासंचालकपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला सेवानिवृत्त झाल्याने पोलीस महासंचालक म्हणून डॉ. जसपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची ही गोव्यात तिसर्यांदा नियुक्ती झालेली आहे. डॉ. सिंग यांनी पोलीस उपअधीक्षक, पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
पोलीस खात्याकडून गुन्हे टाळण्यावर भर दिला जाणार आहे. अमलीपदार्थ, बेकायदा व्यवहाराविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. पूर्वी अमलीपदार्थासाठी गोवा प्रसिद्ध होता. आता, परिस्थितीत बदल झालेला असून गोव्यातील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनार्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. देशी आणि विदेशी पर्यटकांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
राज्यातील वाहतूक सुरक्षेवर भर दिला जाणार आहे. राज्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढला जाणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांचा योग्य अभ्यास करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.