डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांची ३० सप्टेंबर रोजी १५० वी पुण्यतिथी असून या महान नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारी पातळीवर त्यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देहावसान झालेल्या डॉ. गोम्स यांनी पोर्तुगालच्या संसदेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करून भारताच्या स्वातंत्र्यासाठीची मागणी केली होती. डॉ. गोम्स यांनी एका पत्रात मी महाभारत जेथे जन्माला आले आणि जेथे बुद्धीबळाचा शोध लागला तेथे जन्माला आलो असे लिहून त्यांनी पत्राच्या शेवटी भारताचे स्वातंत्र्य व मुक्तीचा प्रकाश बघण्याची मी मागणी करतो, असे लिहून त्या काळात आपले प्रखर राष्ट्रप्रेम दाखवून दिले होते याची जाणीव नव्या पिढीला करून देणे महत्त्वाचे असल्याचे काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून नमूद केले आहे.