डॉ. एडविनच्या पत्नीची न्यायालयात याचिका

0
127

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने डॉ. एडवीन गोम्स यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एका याचिकेची दखल घेऊन आरोग्य सचिव आणि डॉ. गोम्स यांनी एका आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन निगडीत प्रश्‍नांवर सामंजस्याने तोडगा काढावा, असा निर्देश दिला आहे.

डॉ. गोम्स यांची पुन्हा कोविड इस्पितळात नियुक्ती करण्यासाठी हालचाल सुरू झाल्याने डॉ. गोम्स यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात खास याचिका दाखल केली आहे. आरोग्य खात्याकडून डॉ. गोम्स यांचा छळ केला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राज्य सरकारने डॉ. गोम्स यांची मडगाव येथील कोविड इस्पितळात नियुक्ती केली. डॉ. गोम्स यांनी सलग तीन महिने इस्पितळात कामकाज केल्यानंतर काही दिवसांपूर्वी ते घरी परतले.

घरी परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले. डॉ. गोम्स यांना सुट्टी मिळत नाही. त्यांच्या कामकाजाची वेळ ठरलेली नाही. डॉ. गोम्स यांची कोविड इस्पितळात पुन्हा नियुक्ती करू नये, अशी मागणी केली आहे. खंडपीठाने हा विषय न्यायालयाबाहेर सामंजस्याने सोडविण्याची सूचना केली आहे.