डॉ. अवदींवरील विनयभंगाचा आरोप खंडणीसाठी

0
15

>> मेडिकल असोसिएशनचा आरोप, चौकशीची मागणी

येथील प्रसिद्ध ज्येष्ठ डॉ. प्रकाश अवदी यांच्यावर विनयभंगाचा एका 27 वर्षीय युवतीने केलेला आरोप केवळ पैसे उकळण्यासाठी केला आहे असा आरोप करत त्याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी. तसेच मडगाव पोलीस स्थानकावरील उपनिरिक्षकांनी योग्य तपास न करता डॉक्टरना उद्धटपणे वागणूक दिली, त्याचीही सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मडगाव शाखा व गोव्यातील डॉक्टरांनी केली. काल मडगाव पोलीस स्थानकावर उपअधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेत लेखी निवेदन दिले.

आयएमए मडगांवच्या अध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टरांनी, फार्मसी संघटनेने या प्रकाराचा निषेध केला. या प्रकरणाची चौकशी प्राथमिक स्तरावर आहे त्याची सखोल चौकशी केली जाईल. खंडणीच्या मागणीविरोधात डॉक्टरांनी पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवावी. त्याची चौकशी करू असे आश्वासन पोलिस उपअधीक्षक देसाई यांनी दिले.

उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर यांची चौकशी करावी व तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा अशी डॉक्टरांनी मागणी करताच वरील अधिकाऱ्यांशी बोलणी करुन निर्णय घेण्याचे आश्वासन उपअधीक्षक देसाई यांनी दिले.
गेल्या आठवड्यांत ही घटना घडली होती. तपासणीसाठी डॉ. प्रकाश अवदी यांच्या दवाखान्यात सदर तरुणी आली होती. त्यावेळी डॉक्टरनी विनयभंग केला अशी तक्रार दिग्विजय चव्हाण याच्याबरोबर आलेल्या सदर तरुणीने केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी चव्हाण याने डॉ. अवदी यांच्याकडे 15 ते 20 लाख रुपयांची मागणी केली. ही घटना दि. 16 ऑगस्ट रोजी रात्रौ 8.30 च्या वेळी घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर उपनिरीक्षक शिरोडकर यांनी डॉ. अवदी यांना बोलावून चौकशी करत दवाखाना बंद करण्यास सांगितले.

दवाखाना उघडण्याची मागणी
दरम्यान, काल दुपारी डॉ. अवदी यांच्या खारेबांधनजीक दवाखान्यासमोर शेकडो नागरिक, व्यापारी जमले व डॉक्टरांकडे दवाखाना उघडण्याची मागणी केली. सर्व नागरिकांनी डॉक्टरांना पाठिंबा दिला व त्यानी या खंडणी प्रकरणाचा निषेध केला.