डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायद्यात सुधारणा करणार ः राणे

0
3

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्याची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य आरोग्य खात्याने गोमेकॉसह अन्य सर्व सरकारी इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायद्यातही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.
रुग्णांच्या सेवेसाठी दिवस-रात्र इस्पितळात राहणाऱ्या डॉक्टर्स व अन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असून त्यात कोणतेही कसर सोडली जाणार नाही. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राणे यांनी काल दिली. पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरची निर्घृणरित्या जी हत्या करण्यात आली त्या हत्येचा आपण निषेध करीत आहे. एका सेवाभावी डॉक्टरचा नाहक बळी गेलेला असून मृत डॉक्टराच्या कुटुंबीयाप्रती आपण संवेदना व्यक्त करीत आहे. केवळ सरकारी इस्पितळात नव्हे तर खासगी इस्पितळातही डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता असून त्यासंबंधी खासगी इस्पितळांच्या व्यवस्थापनांना आदेश देण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली.

सरकार डॉक्टरांच्या मागे

गोवा राज्यामध्ये कार्यरत असलेल्या सरकारी व खासगी डॉक्टरांना सुरक्षा कवच प्राप्त व्हावे यासाठी गोवा सरकार गांभीर्याने लक्ष देणार आहे. गोवा सरकार डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असून येणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. वाळपईमधील पत्रकार परिषदेमध्ये मंत्री राणे बोलत होते.
खासगी रुग्णालयात काम करणाऱ्याही डॉक्टरांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामध्ये सरकार कमी पडणार नाही असे आश्वासन यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी ह्या स्वतः महिला असून तिथे अशा प्रकारचे कृत्य होत आहे हे लाजीरवाणे आहे. जी घटना घडलेली आहे त्याला पूर्णपणे ममता बॅनर्जी यांचे सरकारच जबाबदार
आहे. यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसून याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मंत्री राणे यांनी यावेळी केली.

सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, उद्या होणार सुनावणी
नवी दिल्ली : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने रविवारी (18 ऑगस्ट) स्वतःहून दखल घेतली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. या खंडपीठात सरन्यायाधीश व्यतिरिक्त न्यायमूर्ती जेबी पास्टरवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा उपस्थित राहणार आहेत.