डॉक्टरांचा आज देशव्यापी संप

0
8

>> कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ संप; गोवाही संपात सहभागी; ओपीडी राहणार बंद

कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आएमए) ने शनिवार दि. 17 ऑगस्ट रोजी 24 तासांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आयएमएने रुग्णालये ‘सेफ झोन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या संपात गोव्यातील डॉक्टरही सहभागी होणार असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह सर्व सरकारी इस्पितळांतील अत्यावश्यक सेवा सोडल्यास अन्य सेवा 24 तास बंद राहणार आहेत. रुग्णांसाठीच्या दैनंदिन स्वरुपाच्या सर्व ओपीडी बंद ठेवण्यात येणार असून, तातडीच्या शस्रक्रिया सोडल्यास अन्य शस्त्रक्रियाही केल्या जाणार नसल्याचे गोवा वैद्यकीय संघटनेने स्पष्ट केले आहे.

9 ऑगस्ट रोजी कोलकाताच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले. अनेक रुग्णालयांमध्ये संप पुकारण्यात आला होता. यानंतर आता आएमएने देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून डॉक्टरांचा संप सुरू होणार असून, रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत तो चालू असेल. या देशव्यापी संघात राज्यातील सर्व डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. त्याशिवाय शनिवारी डॉक्टर्स, नर्सेस व अन्य निमवैद्यकीय कर्मचारी पणजी शहरातून मूक मोर्चा काढणार
आहेत.

याशिवाय शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 या 24 तासांत खासगी रूग्णालयांमध्ये सुद्धा केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
डॉक्टरांचा देशव्यापी संप असला, तरी सर्व अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवण्यात येणार असून, सर्व इस्पितळांतील अपघात विभाग चालू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. मात्र, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सोडून अन्य सर्व वैद्यकीय सेवा मात्र बंद राहणार आहेत.

आज पणजीत मूक मोर्चा
शनिवारी सकाळी 9 वाजता राज्यातील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य निमवैद्यकीय कर्मचारी पणजी शहरातून एक मूक मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा आझाद मैदानापासून जुने वैद्यकीय महाविद्यालय इमारतीपर्यंत काढण्यात येणार आहे. डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह फार्मसी व्यावसायिक व अन्य निमवैद्यकीय व्यावासायिक मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोवा वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने कायदा कडक करावा
देशव्यापी संपाला गोव्यातील परिचारिका संघटना, फार्मसी संघटना, दंतवैद्यक संघटना, आयुर्वेदिक संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला असल्याचे ते म्हणाले. निवासी डॉक्टर्स व परिचारिका यांच्यासह सर्व वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने कडक कायदा करावा, अशी मागणीही डॉ. संदेश चोडणकर यांनी केली.

गोमेकॉबाहेर डॉक्टरांची निदर्शने
कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरावरील बलात्कार व खून प्रकरणी न्यायाची मागणी करीत काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील व इस्पितळातील निवासी डॉक्टरांनी इस्पितळाबाहेर निदर्शने केली.