डॉक्टरच्या खूनप्रकरणी चौघांच्या राजस्थानमध्ये मुसक्या आवळल्या

0
18

बाणावलीतील बेताळभाटी येथे बुधवारी एका 27 वर्षीय निर्वाण भारत या डॉक्टरच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी 48 तासांच्या आत कोलवा पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने चौघांच्या राजस्थानात मुसक्या आवळल्या. सिमांचल परिदा (31, रा. ओडिसा), आलोक सिंग (19, रा. राजस्थान), नागेंद्रकुमार (25, रा. राजस्थान) आणि शाहिद खान (23, रा. दादर मुंबई) संशयितांची नावे आहेत. त्यांना अटक करून रोख रक्कम, मोबाईल आणि कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या सर्व संशयितांना कोलवा पोलीस शुक्रवारी राजस्थानातून गोव्यात आणण्याची शक्यता आहे.

मृत डॉ. निर्वाण भारत हे मूळ बिहार येथील असून, नागवाडो-बेतालभाटी येथील क्विनी रेसिडेन्सीमधील दुसऱ्या मजल्यावर सदनिकेत राहत होते. ते नुवे येथील माय आय हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. डॉ. निर्वाण भारत यांच्या प्लॅटमध्ये सिमांचल परिदा हा स्वयंपाकी म्हणून कामाला होता. तसेच एक मोलकरीण देखील कामाला होती. दोन दिवस डॉ. निर्वाण भारत हे कामाला आला नसल्याने हॉस्पिटलमधून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सदनिकेत काम करणारी एक मोलकरीण बुधवारी सायंकाळी कामासाठी आली असता, तिला पलंगाच्या खाली डॉ. निर्वाण भारत यांचा मृतदेह दिसून आला. तिने या प्रकाराची कल्पना शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांना सिमांचल परिदा हा कारमधून राजस्थानला पळून गेल्याची माहिती मिळाली. तसेच पोलिसांना कारचा क्रमांकही मिळाला त्यानंतर राजस्थान पोलीस व गोवा पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. त्याचदरम्यान राजस्थानमध्ये एमएच-14-सीसी-2985 या लाल रंगाच्या कारमधून प्रवास करीत असताना परिदा याच्यासह चौघेजण संशयास्पद स्थितीत राजस्थान पोलिसांना आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली.

स्वयंपाकी इसमावर संशय बळावला

बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता व पोलिसांनी सदनिकेची झाडाझडती घेतली असता, त्यांना डॉक्टरचा मृतदेह हातपाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत पलंगाच्या खाली दिसून आला. तसेच घरातील पैसे, सोने, इतर मौल्यवान वस्तू आणि डॉक्टरांची कार गायब होती. यावेळी शेजाऱ्यांनी सिमांचल परिदा हा दोन दिवसांपासून गायब असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्यानंतर कोलवा पोलिसांनी सीसीटीव्हीतून त्याचे छायाचित्र मिळवत त्या दिशेने तपास सुरू केला.