डेन्लीकडे नाही योग्यता ः वॉन

0
130

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी नियमित कर्णधार ज्यो रुट संघात परतल्यानंतर ज्यो डेन्ली याला बाहेरचा रस्ता दाखवून झॅक क्रॉवली याला संघात ठेवावे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने काल रविवारी व्यक्त केले आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १८ व २९ धावा केल्या डेन्ली याला मागील आठ कसोटी डावांत अर्धशतकी वेस ओलांडता आलेली नाही. डेन्ली याचा केंट संघातील साथी क्रॉवली याने दुसर्‍या डावात ७६ धावा जमवत प्रभावी कामगिरी केली आहे. पत्नीच्या प्रसुतीमुळे रुट याला साऊथहॅम्पटन येथे काल संपलेल्या पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते.

इंग्लंडचे ५१ कसोटीत नेतृत्व केलेल्या वॉन याने पुढे बोलताना सांगितले की, संघात कोण राहणार व कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याविषयी फारशी चर्चा आवश्यक नाही. चमक न दाखवता व एकही शतक न ठोकता इंग्लंडसाठी तब्बल १५ कसोटी सामने खेळण्याची संधी डेन्ली याला मिळाल्याचे आश्‍चर्य वॉन याने व्यक्त केले. इंग्लंडसाठी केवळ ८ कसोटी खेळून शतक ठोकलेले खेळाडू मी पाहिले आहेत. रुटच्या अनुपस्थितीमुळे डेन्लीला संधी मिळाली. परंतु, ही सुवर्णसंधी त्याने नेहमीप्रमाणे दवडल्याचे वॉन म्हणाला.

३४ वर्षीय डेन्लीसाठी २२ वर्षीय क्रॉवलीला बाहेर बसवल्यास नवोदितांमध्ये योग्य संदेश जाणार नसल्याचे वॉन शेवटी म्हणाला. १५ कसोटीतील २८ डावांत डेन्ली याला शतकी वेस ओलांडता आलेली नाही. त्याची सरासरी केवळ २९.५३ आहे.