डेंग्यूबाबत आज संयुक्त बैठक ः आरोग्यमंत्री

0
113

राज्यातील डेंग्यूच्या फैलावाबाबत विविध खात्याची संयुक्त बैठक आज मंगळवारी घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.
राज्यातील डेंग्यूच्या वाढत्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व खात्याकडून सहकार्याची अपेक्षा आरोग्य मंत्री राणे यांनी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेतली जात आहे. आरोग्य खात्याबरोबरच पंचायत आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक आमदार, सरपंच, पंच सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक या सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात डेंग्यूबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. त्यांना आरोग्य खात्याकडून सर्व सहकार्य दिले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत डेंग्यूच्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत, असेही राणे यांनी सांगितले.
राज्यात मागील नऊ महिन्यात १४६८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यात १३८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. मडगाव, वास्को, पणजी या भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळल असून इतर भागातही रुग्ण आढळून येत आहेत.

वर्ष २०१९ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात १४६८ संशयास्पद डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील २१७ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध भागात साचून राहणार्‍या पाण्यात कीटकनाशक फवारणी, धुराची फवारणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पंचायत यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे राणे म्हणाले.