>> कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची माहिती; कोविडनंतर गेली 4 वर्षे होती व्याख्यानमाला बंद
इतिहासतज्ज्ञ, गणितीतज्ज्ञ तथा वैचारिक अभ्यासाच्या नव्या प्रकाराचे
उद्गाते दामोदर धर्मानंद ऊर्फ डी. डी. कोसंबी यांच्या नावे कला संस्कृती संचालनालयातर्फे होणारा ‘डी. डी. कोसंबी विचार महोत्सव’ यंदा 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणार आहे. कला आणि संस्कृती खात्याची गेल्या 4 वर्षांपासून बंद पडलेली ही व्याख्यानमाला यंदापासून पुन्हा सुरू होत आहे. कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत कोसंबी विचार महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला.
कोविड महामारीचा काळ आणि निवडणूका आदींमुळे मागची 4 वर्षे हा अत्यंत महत्त्वाचा असा महोत्सव होऊ शकला नाही, याची खात्याला खंत असल्याचे सांगतानाच आता नव्या उत्साहाने यंदापासून हा महोत्सव होत असल्याने त्याचा आम्हाला आनंद असल्याचे गावडे यांनी यावेळी नमूद केले.
सोमवार दि. 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कला-संस्कृती खात्याचा मंत्री म्हणून आपणही विशेष अतिथी म्हणून हजर राहणार असल्याचे गावडे म्हणाले. यंदाच्या महोत्सवात प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास, नामवंत हिंदी साहित्यिक अलका सराओगी, उद्योजक तथा प्रतिभाशाली लेखक, छायाचित्रकार व डिझाईनर आदित्य गुप्ता, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा, जीवनाव्रती पद्मश्री निवेदिता भिडे व निवृत्त नौदल कमांडर अभिलाष टॉमी हे वक्ते पुष्प गुंफतील, असे गावडे यांनी सांगितले. या महोत्सवात व्याख्यान देण्यासाठीच्या दिग्गजांची निवड करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती यावेळी गावडे यांनी दिली.
भारत सरकारने डी. डी. कोसंबी या थोर भारत भूषण व्यक्तिमत्वाची जुलै 2007 ते जुलै 2008 या काळात जन्मशताब्दी साजरी करण्याचे ठरवले, तेव्हापासून (2008) दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कला-संस्कृती संचालनालयातर्फे हा महोत्सव आयोजित केला जात आहे व त्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी अशा सर्व स्तरांतील श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आला आहे. या महोत्सवाची वाट श्रोते आतुरतेने पहात असतात, असेही गावडे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला कला-संस्कृती सचिव सुनील आंचिपाका, कला-संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक मिलिंद माटे उपस्थित होते.
पाच दिवस मान्यवरांची व्याख्याने
दि. 24 रोजी संध्याकाळी 5 वाजता मोटिवेशनल स्पीकर व लाईफ कोच गौर गोपालदास यांच्या व्याख्यानाने या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून, ते ‘नातेसंबंध आणि आयुष्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
मंगळवार दि. 25 रोजी सुप्रसिद्ध लेखिका अलका सरौगी या ‘अँड इट सेज, सेव्ह मी फ्रॉम सुसाईड’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
बुधवार दि. 26 रोजी आदित्य गुप्ता हे ‘एवरेस्टवरून जीवनाचे सात धडे’ या विषयावर, तर गुरुवार दि. 27 रोजी पद्मश्री निवेदिता भिडे या ‘स्वामी विवेकानंदांचे विचार’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. 28 रोजी निवृत्त नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांचे ‘सेलिंग अराऊंड दी वर्ल्ड’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे.