‘डीपफेक’मुळे समाजात अराजकता निर्माण होईल : पंतप्रधान

0
21

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गैरवापराविषयी नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी सतर्क राहण्याची गरज

अभिनेत्री रश्मिका मंदाना, कॅटरिना कैफ यासह अनेक अभिनेत्री डीपफेक तंत्रज्ञानाला बळी पडल्या आहेत. डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेक अभिनेत्रींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची केंद्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या तंत्रज्ञानाच्या गैरवापराची दखल घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा डीपफेक तंत्रज्ञानामुळे समाजात अराजकता निर्माण होईल, अशी भीती देखील त्यांनी काल व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात ‘दिवाळी मिलनब कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. डीपफेक हा सध्या भारतीय व्यवस्थेला भेडसावत असलेल्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. यामुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते. या वाढत्या समस्येबद्दल लोकांना जागरुक करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी माध्यमांना केले. डीपफेकसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) गैरवापराच्या बाबतीत नागरिक आणि प्रसारमाध्यमे दोघांनीही सतर्क राहण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कसे काम करते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्यांचा उपयोग जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्यासाठी किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने केला जाऊ शकतो, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा खेळतानाचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत त्यांनी खुलासा केला. आपण लहानपणापासून गरबा खेळलेलो नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांसारखा दिसणारा एक पुरुष काही महिलांसोबत गरबा खेळताना दिसत आहे. फॅक्ट चेकनुसार, असे आढळून आले आहे की, व्हिडिओमध्ये डीपफेकचा वापर झालेला नसून, ती व्यक्ती प्रत्यक्षात पंतप्रधानांसारखीच दिसणारी असून, त्यांचे नाव विकास महंते असे आहे, ते एक अभिनेते आहेत.

डीपफेक’साठी केंद्र सरकारकडून शिक्षेची तरतूद

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशा व्हिडिओविरोधात कठोर कारवाईची मागणी होऊ लागली होती. डीपफेक तयार करून पसरवल्यास 1 लाख रुपये दंड आणि तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.