डीएसएस योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शनचे पैसे लवकरच : मुख्यमंत्री

0
18

दयानंद सामाजिक सुरक्षा योजने (डीएसएसएस) खाली ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित असलेले पेन्शनचे पैसे त्यांना लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यापुढे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पेन्शनचे पैसे दर महिन्याला विनाविलंब देण्याची सोय करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पेन्शनचे पैसे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या कित्येक अंगणवाडी सेविकांना खात्याने निलंबित केले हेाते. या सेविकांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व आपले निलंबन मागे घेण्याची त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण या प्रश्‍नी खात्याच्या संचालकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन अंगणवाडी सेविकांना दिले.

दरम्यान, काल विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समाज कल्याण खात्याच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नसल्याचे सांगून ते त्यांना विनाविलंब मिळतील याकडे लक्ष देण्याची विनंती केली. तसेच निलंबित अंगणवाडी सेविकांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी त्यांच्याकडे केली.