नव्या जुवारी पुलाचे ५० टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित ५० टक्के काम नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल या प्रतिनिधीला सांगितले. डिसेंबर २०२० पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या पुलाच्या खांबांवर कमानी बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही पाऊसकर यांनी दिली. नोव्हेंबर २०२० पर्यंत नव्या जुवारी पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पुलाचे काम रेंगाळल्याचा
सुदिन ढवळीकरांचा आरोप
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांना नव्या जुवारी पुलाविषयी विचारले असता ते म्हणाले, की सध्या या पुलाचे काम रेंगाळले असून त्याला मंत्री दीपक पाऊसकर हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. खरे म्हणजे या पुलाची एक लेन यापूर्वीच वाहतुकीसाठी खुली व्हायला हवी होती, असे ढवळीकर म्हणाले. या पुलाची एक लेन डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी पूल खुला करण्याचा विचार होता, असे ते म्हणाले.
जमीन संपादनाचे काम
अजूनही अपुर्णावस्थेतच
दरम्यान, या पुलाचे ५० टक्के एवढे काम पूर्ण झालेले असतानाच या पुलासाठीच्या जमीन संपादनाचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे वृत्त आहे. त्यासंबंधी माहिती देताना सुदिन ढवळीकर म्हणाले, की या पुलासाठी जमीन संपादनाचे काम अजूनही शिल्लक राहिले आहे. पुलाच्या फ्लाय ओव्हरसाठीच्या जमीन संपादनाचे काम काही ठिकाणी पूर्ण झालेले नाही. जमीनदारांना नुकसान भरपाई देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचा पुलाच्या बांधकामावर परिणाम झाला असल्याचे ते म्हणाले. आगशी येथे ज्या ठिकाणी निवासी घरे आहेत तेथे जमीन संपादनास लोकांनी विरोध केल्याने पूल त्या निवासी घरांच्या मागच्या बाजूने न्यावा लागल्याचे ते म्हणाले. त्यामुळेही थोडा विलंब झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
दीपक पाऊसकर कितीही सांगो. पण या पुलाचे काम २०२० च्या शेवटपर्यंत कसेही पूर्ण होणार नसल्याचे ढवळीकर म्हणाले.