डिसेंबर महिन्यात कोरोनाने ५१ जणांचा बळी घेतला. या महिन्यात नवीन ३१०३ कोरोना रुग्ण आढळून आले. तर, ३४४८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. महिन्याभरात ५० हजार ३३५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच इस्पितळात १०५४ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
काल दोघांचा मृत्यू
राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ८५ कोरोना रुग्ण आढळून आले असून आणखी २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ७३९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ५१ हजारांचा टप्पा पार केला असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ०६६ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९३९ एवढी आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आणखी ७५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९,३८८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के एवढे आहे.
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये सांगे येथील ६६ वर्षीय पुरूष रूग्ण आणि पर्रा बार्देश येथील ८४ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ५० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३० रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
चोवीस तासांत नवीन १८२० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३ लाख ९९ हजार २०६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
मडगाव येथील आरोग्य केंद्राच्या कक्षेत सर्वाधिक ९६ रुग्ण आहेत. फोंडा आरोग्य केंद्राच्या कक्षेत ५३ रुग्ण, पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६८ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५३ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. राज्यात पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दिल्लीसह तामिळनाडूतही
नवीन कोरोनाचे रुग्ण
आतापर्यंत १६ देशांत पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने भारताची राजधानी दिल्लीसह तामिळनाडूमध्येही प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीत एका प्रवाशाला हा नवीन कोरोना झाल्याचे उघड झाले. याशिवाय, गेल्या १२ तासांत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोइंबतूर आणि चेन्नई या दोन ठिकाणी प्रत्येकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता परतलेल्या प्रवाशांपैकी कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २२ झाली आहे.
दिल्लीतील कोरोनाबाधित रूग्णांपैकी चार रूग्णांच्या अहवालात कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आला असल्याची माहिती काल दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
दि. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून परतलेल्या ३३ हजार नागरिकांतील ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात सुरूवातीला बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आला.
हैदराबाद प्रयोगशाळेत दोन तर पुण्यातील प्रयोगशाळेत एक असे एकूण सहा रुग्ण नवीन कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर काल दिल्ली आणि तमिळनाडूतही या नव्या प्रकारच्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे.