डिसेंबरपासून दोनापावल जेटी पर्यटक, जनतेसाठी खुली होणार

0
7

>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती; व्यवसायातील गैरप्रकार दूर करण्यासाठी धोरण

राज्याच्या जलक्रीडा धोरणाचा मसुदा तयार केला जात असून, येत्या डिसेंबरपर्यंत धोरणाचा मसुदा जाहीर केला जाणार आहे, असे मंत्री पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जलक्रीडा प्रकारातील गैरप्रकार दूर करण्यासाठी सदर धोरण तयार केले जात आहे.
यावेळी पर्यटनमंत्र्यांनी जेटी धोरणावरही भाष्य केले. राज्यात पर्यटन खात्याच्या जेटी धोरणाच्या मसुद्याला विरोध केला जात असला, तरी राज्य सरकार जेटी धोरणावर ठाम असून, पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी धोरण तयार केले जात आहे. आपण त्याला ‘पर्यटन जेटी धोरण’ संबोधले पाहिजे, असे खंवटे यांनी सांगितले.

पर्यटन खात्याच्या जेटी धोरणाबाबत ग्रामसभेत आक्षेप घेणार्‍यांना येत्या ३१ ऑक्टोबरच्या मुदतीपूर्वी त्यांच्या सूचना आणि हरकती सादर कराव्या लागतील, असेही खंवटे यांनी सांगितले.
सनबर्न संगीत महोत्सवात संयोजकांनी तीन दिवसीय संगीत महोत्सवात गोव्यातील कलाकारांसाठी खास व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रोहन खंवटे यांनी दिली.

राज्यात येत्या २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार्‍या सनबर्न ईडीएम महोत्सवाला परवानगी देण्यापूर्वी सरकारने ही एक पूर्वअट आयोजकांसमोर ठेवली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी गोव्यातील गाव आणि गोवावासीयांसाठी संधीही उपलब्ध करण्याची अट घातली आहे. सनबर्नकडून सरकारसमोर संगीत महोत्सवाच्या नियोजित कार्यक्रमाबाबत सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर सनबर्नबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.
पर्यटन मंडळाच्या शिफारशीनुसार यूके आणि रशिया व्यतिरिक्त नवीन ओपनिंगचा विचार सुरू आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

शॅकचालकांच्या समस्यांवर आज तोडगा
राज्यातील किनारी भागातील शॅकचालकांना भेडसावणार्‍या समस्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडण्यात आल्या असून, त्यावर शुक्रवारपर्यंत तोडगा काढला जाणार आहे. शॅकचे शुल्क वाढवलेले नाही. सध्याच्या धोरणानुसारच शुल्क आकारले जात आहे. डेक बेडच्या शुल्कात थोडी कपात केली जाऊ शकते, असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले.