रेशन कार्डांचे डिजिटलायजेशन केल्या नंतर बोगस रेशनकार्डे तयार करणे कुणालाही शक्य होणार नसल्याचे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार बाबू कवळेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
राज्यात खात्याची एकूण किती स्वस्त धान्य दुकाने आहेत, असा प्रश्न कवळेकर यांनी विचारला होता. खाते या सर्व दुकानांना १०० टक्के धान्य पुरवत नसल्याचे सांगून त्यामुळे बर्याच रेशनकार्डधारकांना धान्य उपलब्ध होऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.
यावर उत्तर देताना दयानंद मांद्रेकर म्हणाले की, दारिद्य्र रेषेवरील जे रेशनकार्डधारक आहेत त्यापैकी बहुतेक कार्डधारक हे धान्य नेत नसतात. मात्र, दारिद्य्र रेषेखालील सर्व कार्डधारक धान्य नेत असून त्यांना धान्य मिळेल याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना बाबू कवळेकर यांनी सणांच्या दिवसांत स्वस्त धान्य दुकानांना धान्याचा जास्त कोटा दिला जावा अशी मागणी केली. त्यावर बोलताना सणाच्या दिवसांत जास्त धान्य पुरवण्यात येत असल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले. यावेळी हस्तक्षेप करताना आमदार नरेश सावळ म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस रेशनकार्डे आहेत. बार्देशमध्ये अशी १८७५ बोगस रेशनकार्डे असल्याचे ते म्हणाले. त्यावर बोलताना मांद्रेकर म्हणाले की, लवकरच रेशनकार्डांचे डिजिटलायजेशन करण्यात येणार असून त्यानंतर कुणालाही बोगस कार्ड करता येणार नाही.