डिचोली पालिकेचा संयुक्त बैठकीत निर्णय
डिचोली शहर व परिसरातील जुन्या जलवाहिन्या लवकरच बदलण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यास सुमारे 12 कोटी रूपये सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे खर्च करण्यात येणार आहे. हे काम पाच टप्प्यांत होणार असून एका वर्षाच्या आत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी दिली. शहरातील भूमीगत वीज वाहिन्या घालण्याचेही काम हाती घेऊन लवकरच संपविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
डिचोली नगरपालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभाग, रस्ता विभागाचे अधिकारी व वीज खात्याचे अधिकारी यांच्याशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्षा सुखदा तेली, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, दीपा शिरगावकर, दीपा पळ, नीलेश टोपले, ॲड. रंजना वायंगणकर, अनिकेत चणेकर, ॲड. अपर्णा फोगेरी, रियाझ बेग, गुंजन कोरगावकर, सतीश गावकर, सुदन गोवेकर, मुख्याधिकारी सचिन देसाई, कनिष्ठ अभियंता नदीम शेख, पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक सहाय्यक रोहिदास नाईक, सहाय्यक अभियंता काकोडे, रस्ता विभागाचे कनिष्ठ अभियंता फुलारी, वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता दीपक केरकर व इतरांची उपस्थिती होती.
सिमेंटच्या जलवाहिन्या बदलून पीव्हीसी वाहिन्या घालण्यात येणार आहेत. डिचोली शहरात तसेच परिसरातील जलवाहिन्या फारच जुन्या झाल्या आहेत. सुमारे 40 वर्षांपूर्वी घातलेल्या सदर सिमेंटच्या वाहिन्या कुठेही फुटल्यास दुरूस्त करताना बराच वेळ वाया जातो. त्याचा परिणाम लोकांना होणाऱ्या जल पुरवठ्यावर होतो. त्यासाठी या सर्व जलवाहिन्या बदलून त्या ठिकाणी पीव्हीसी वाहिन्या घालण्यात येणार आहेत. हे काम गेल्या 2019 साली मंजूर झाले होते. त्यानंतर कोवीड महामारी व काही तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रलंबित राहिले होते. आता या कामाला मुहूर्त मिळाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
वरील विषयावर निर्णय घेण्यासाठी डिचोली नगरपालिका कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जलवाहिन्यांच्या कामावर चर्चा झाली. डिचोली शहरात, बाजारात तसेच बोर्डे वडाकडे येथून अंतर्गत रस्त्यांमध्ये, व्हाळशी ते कुंभारवाडा पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन जलवाहिनी घातली जाणार आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन घ्यायचे झाल्यास एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कनेक्शन नेताना आडवा रस्ता फोडण्याची गरज पडणार नाही. या कामासाठी नगरपालिकेच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता आहे. ती लवकरच दिली जाणार आहे, असे नगराध्यक्ष फळारी यांनी सांगितले.