- गौरी भालचंद्र
डायरी म्हणजे एक आरसा आहे आपलं स्वरूप दाखवणारा… आपल्या मनाला जसे अनुभव येतात तसे ते आपण आपल्या मनातील विचार डायरीला सांगत असतो. त्यातून मन स्थिर होत असतं, हलकं होतं. रिलॅक्स वाटतं मनाला!
आजकालच्या धावपळीच्या जीवनात माणसाला स्वतःच्या माणसांसाठी वेळ असत नाही अश्या वेळी या डायरीशी आपण आपलं हितगुज करू शकतो. आपले मनातील विचार मोकळेपणाने डायरीमध्ये लिहिल्यामुळे झोप खूप छान येते .. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची नोंद राहते .. आपल्या माणसांशी संबंधित इम्पॉर्टन्ट दिवस .. बर्थडे.
डायरी लिहिणं एक कला आहे असं मला वाटतं.. स्वहस्ताक्षरात नव्याकोर्या डायरीत लिहायचा आनंद हा सुखावणारा असतोच. आनंदाच्या, यशाच्या सकारात्मक गोष्टींच्या नोंदी करण्यासाठीसुद्धा कधीतरी डायरीचा वापर करतात. खूप फरक असतो कॉलेजच्या मुलींची डायरी आणि गृहिणीची डायरी यांमध्ये…
डायरी लिखाणाला भाषा, शैली, शब्दमर्यादा, स्थळ, काळ कशाचेही बंधन नसते. आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारी डायरी मला फार आवडते. जे आपण दुसर्या कुणालाच सांगू शकत नाही ते सारं गुलाबी हितगुज डायरीत लिहिलं जातं. मनातल्या गोष्टी डायरीत लिहिल्यामुळे किंवा व्यक्त केल्यामुळे मनाला समाधान वाटतं
सातत्य टिकवण्याची एक सवय लागते. आपल्या विचारांना डायरीत लिहिणं खूपच छान असतं. आपण जसा विचार करतो… जे अनुभवतो तेच डायरीमध्ये शब्दांकित करत असतो .. आपले विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक यावर आपल्या डायरीचं स्वरूप अवलंबून असतं … आपल्याला अनेक प्रेरित करणार्या घटना आपण या डायरीत लिहू शकतो.
आपल्याच जीवनाकडे आपण एक परीक्षक म्हणून पाहण्याची सवय लागते आणि आपण रोजच्या रोज अपडेट होत असतो… आपण कुठे बरोबर वागलो, कुठे काय चुकलो याचं अवलोकन करता येतं आणि आपणच आपल्याला सुधारू शकतो. आपली क्षमता काय आहे याचे ज्ञानही होते आपल्याला.
आज तुम्हाला काही चांगले वाटले का? आपल्या डायरीमध्ये हे सांगा.. खूप मस्त वाटतं मनाला… पूर्ण दिवसाच्या घटनाक्रमाला आपण डायरीत लिहितो त्यावेळी त्याचे पुन्हा एकदा वाचन करताच आपल्याला नवे विचार… नव्या आयडिया लक्षात येतात …
आपल्या भविष्यातील योजना.. आपल्याला आलेले अनुभव… वर्तमान परिस्थितीबाबतच्या गोष्टी तसेच आपल्या दिवसभरातील कामकाजाचा आढावा आपण दिवसाच्या शेवटी डायरीत नोंदवत असतो … आपल्या डायरीला आपला मित्र किंवा मैत्रीण समजून विनासंकोच आपल्या मनातील हितगुज तिच्याशी अगदी मनमोकळेपणाने करावे असे मला वाटते.
आपणच लिहिलेली डायरीची पाने आपल्याला प्रेरणा देण्याचे काम करत असतात. डायरी लेखनामुळे आपल्या स्मरणशक्तीत वाढ होत असते. डायरी आपल्याला आपल्या जीवनाचा आरसा दाखवत असते तर पुढे चालायचा रस्ता कसा आखायचा याचे मार्गदर्शनही करत असते.
डायरी म्हणजे एक आरसा आहे आपलं स्वरूप दाखवणारा… आपल्या मनाला जसे अनुभव येतात तसे ते आपण आपल्या मनातील विचार डायरीला सांगत असतो. त्यातून मन स्थिर होत असतं, हलकं होतं. रिलॅक्स वाटतं मनाला! आपल्या विचारांना डायरीत नोंदवताना आपण एका नव्या जगात प्रवेश करत असतो आणि आपण वर्तमानावर नीट फोकस करू शकतो.
डायरी-लेखन ही आरोग्यासाठीही उत्तम सवय आहे असे मला वाटते. कारण मनातल्या ज्या गोष्टी आपण कोणाशी शेअर करू शकत नाही त्या आपण डायरीत लिहू शकतो… यातून आपल्याला मनमोकळे आणि ताजेतवाने वाटते. झोप पण शांत येते.. एक सांगू, डायरीमुळे आपण कुठे चुकतो, कुठे बरोबर आहे.. याची समज येते आणि आपण आपल्या आयष्याला निश्चितच एक छान दिशा देऊ शकतो.