>> भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी रंगतदार स्थितीत
११० वर्षांपूर्वीचा
विक्रम मोडीत
पाहुण्या खेळाडूने सातव्या स्थानावर फलंदाजीस येत पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा ११० वर्षांपूर्वीचा विक्रम वॉशिंग्टन सुंदरने काल मोडला. सुंदरने ६२ धावांची खेळी केली. १९११ साली इंग्लंडच्या फ्रँक फॉस्टर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन भूमीवर ५८ धावांची खेळी केली होती.
वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या १२३ धावांच्या भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी ३३६ धावांपर्यंत मजल मारली. या नवोदित दुकलींच्या अर्धशतकांमुळे कांगारूंना पहिल्या डावात केवळ ३३ धावांच्या नाममात्र आघाडीवर समाधान मानावे लागले. दिवसअखेर त्यांनी बिनबाद २१ धावा करत आघाडी ५४ धावांपर्यंत फुगवली आहे.
आपला केवळ दुसरा कसोटी सामना खेळणारा मुंबईकर शार्दुल व तामिळनाडूचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट असा शिक्का बसलेला ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर यांनी कांगारूंच्या गोलंदाजांचा काल घामटा काढला. भारतीय संघ ६ बाद १८६ अशा दयनीय स्थितीत असताना ऑस्ट्रेलिया संघाला किमान शतकी आघाडीची स्वप्ने पडू लागली होती. या स्थितीत ही जोडी जमली. पहिल्या डावात प्रत्येकी ३ बळी घेतल्यानंतर या दोघांनी आपल्या बॅटचा इंगा दाखवला.
टीम इंडियाकडून ब्रिस्बेन मैदानावर सातव्या गड्यासाठीची सर्वोत्तम भागीदारी त्यांनी केली. यापूर्वी १९९१ साली कपिलदेव व मनोज प्रभाकर यांचा ५८ धावांचा विक्रम त्यांनी सहज मोडला. कसोटी पदार्पणात अर्धशतक व तीन बळी घेणारा तो तिसरा भारतीय ठरला. दत्तू फडकर व हनुमा विहारी यांनी हा कारनामा केला होता.
शार्दुल ठाकूर याचा त्रिफळा उडवून कमिन्सने ही भागीदारी संपुष्टात आणली. तोपर्यंत मोठी आघाडीचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले होते. शार्दुलने ११५ चेंडूंत ६७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक ५ गडी बाद केले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद ३६९
भारत पहिला डाव ः (२ बाद ६२ वरून) ः चेतेश्वर पुजारा झे. पेन गो. हेझलवूड २५, अजिंक्य रहाणे झे. वेड गो. स्टार्क ३८, ऋषभ पंत झे. ग्रीन गो. हेझलवूड २३, वॉशिंग्टन सुंदर झे. ग्रीन गो. स्टार्क ६२, शार्दुल ठाकूर त्रि. गो. कमिन्स ६७, नवदीप सैनी झे. स्मिथ गो. हेझलवूड ५, मोहम्मद सिराज त्रि. गो. हेझलवूड १३, थंगरसू नटराजन नाबाद १, अवांतर १४, एकूण १११.४ षटकांत सर्वबाद ३३६
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क २३-३-८८-२, जोश हेझलवूड २४.४-६-५७-५, पॅट कमिन्स २७-५-९४-२, कॅमेरून ग्रीन ८-१-२०-०, नॅथन लायन २८-९-६५-१, मार्नस लाबुशेन १-१-०-०
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः मार्कुस हॅरिस नाबाद १, डेव्हिड वॉर्नर नाबाद २०, अवांतर ०, एकूण ६ षटकांत बिनबाद २१. गोलंदाजी ः मोहम्मद सिराज २-१-१२-०, थंगरसू नटराजन ३-०-६-०, वॉशिंग्टन सुंदर १-०-३-०