सरकारने लोलये येथे आयआयटी प्रकल्प उभारण्याचे ठरविले असून ठरलेल्या जागेतच हा शिक्षण प्रकल्प उभा राहिल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांना सांगितले.
कोणताही प्रकल्प कुठे व्हावा किंवा होऊ नये हा निर्णय कोणतीही एक पंचायत घेऊ शकत नाही. आयआयटी हा राज्याचा प्रकल्प आहे. लोलये भागातील उच्च पदावरील शिक्षित लोक लोलयेत आयआयटी प्रकल्प उभा राहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यामुळे काही लोकांनी केलेल्या विरोधामुळे प्रकल्प रद्द होणार नाही, असे पार्सेकर यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी
७५ कोटी रु. मंजूर
तूयें-पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी केंद्र सरकारने आवश्यक ते सर्व सोपस्कार पूर्ण करून ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढील आठ दिवसांत केंद्राकडून यासंबंधीचा लेखी आदेश येऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुरुवातीस या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये देण्याचे ठरले होते. केंद्राने त्यात वाढ केल्याचे पार्सेकर म्हणाले. या प्रकल्पामुळे युवकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले.