ट्रायडंटस्‌ची सीपीएलमधून एक्झिट

0
85

गयाना ऍमेझॉन वॉरियर्सकडून स्वीकाराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर बार्बेडोस ट्रायडंटस्ला कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतून बाहेरचा रस्ता धरावा लागला. ट्रायडंटस्‌च्या पराभवामुळे जमैका तलावाहज्‌चा उपांत्य फेरीतील प्रवेश सुकर झाला. ट्रायडंटस्‌ने ठेवलेले ९० धावांचे माफक लक्ष्य गयानाने केवळ ४ गडी गमावून १४.२ षटकांत गाठले.

स्पर्धेतील या २६व्या सामन्यात गयानाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विद्यमान विजेत्या बार्बेडोसला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची आवश्यकता होती. परंतु, त्यांना ते शक्य झाले नाही.
जॉन्सन चार्ल्स व जस्टीन ग्रीव्हज या सलामीवीरांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिल्यानंतर मधली फळी साफ कोलमडली. अष्टपैलू मिचेल सेंटनर (१८) व नईम यंग (१८) यांनी केलेल्या धावांमुळे त्यांना नव्वदीच्या आसपास पोहोचता आले. त्यांनी निर्धारित २० षटकांत ९ बाद ८९ धावा केल्या. मध्यमगती गोलंदाज रोमारियो शेफर्ड व लेगस्पिनर इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत बार्बेडोस संघाचे कंबरडे मोडले.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गयानाची ४ बाद ४९ अशी घसरगुंडी उडाली होती. परंतु, लक्ष्य मोठे नसल्याने शिमरॉन हेटमायर (३३ चेंडूंत नाबाद ३२) व रॉस टेलर (२२ चेंडूंत नाबाद १६) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह गयानाचे १० सामन्यांतून १२ गुण झाले असून त्यांचा संघ गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. नऊ सामन्यांतून केवळ ४ गुण मिळवून शकलेला बार्बेडोसचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

पॅट्रियोटस्‌चा सामना रद्द
स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर झालेल्या सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस् व जमैका तलावाहज् यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी पॅट्रियोटस्‌ने ५.४ षटकांत बिनबाद ४६ धावा केल्या होत्या. इविन लुईस २१ व ख्रिस लिन २३ धावांवर नाबाद होते. जमैका तलावाहज्ला फलंदाजीची संधी मिळाली नाही.