ट्रम्प यांची माघार; बहुतांश देशांवर फक्त 10 टक्के आयात शुल्क

0
12

>> वाढीव आयात शुल्काला तूर्त 90 दिवसांची स्थगिती; चीनवर मात्र 125 टक्के आयातशुल्काची घोषणा

आयात शुल्काच्या (टॅरिफ)च्या दहशतीमुळे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये अस्थैर्य निर्माण केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे घेतले. बुधवारी रात्री त्यांनी बहुतांश देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफ (जशास तसे कर) 90 दिवसांसाठी स्थगित केले. तथापि, चीनवरील आयात शुल्क दर 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

जगभरातील 70 देशांमध्ये सरसकट परस्पर आयातशुल्क लादून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता निर्माण केल्यानंतर दोन दिवसांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या निर्णयावरून घुमजाव केल्याचे पाहायला मिळाले.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, ज्या देशांनी अमेरिकेबरोबर संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला नाही त्यांच्याविरोधातील वाढीव आयातशुल्काला स्थगिती दिली जात आहे. त्याचवेळी या देशांवरील 10 टक्के आयातशुल्क कायम राहील, असे त्यांनी जाहीर केले.
तत्पूर्वी अमेरिकेच्या 104 टक्के आयातशुल्काला उत्तर देताना चीनने अमेरिकेवर 84 टक्के आयातशुल्क लागू केल्याचे जाहीर केले होते. चीनने अमेरिकेच्या करधोरणांविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे अधिकृत तक्रार केली. यानंतर अमेरिकेने पुन्हा आयात शुल्कात वाढ करत ते 125 टक्के केले.
या हालचालीमुळे असे दिसून आले आहे की सध्या हे व्यापार युद्ध संपूर्ण जगाऐवजी अमेरिका आणि चीनपुरते मर्यादित आहे. ट्रम्प यांनी 3 एप्रिल रोजी जशास तसे कर आकारणीची घोषणा केली होती.

आता फक्त 10 टक्के आयात शुल्क
बहुतांश देशांनी अमेरिकेवर कोणतेही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादलेले नाही, म्हणून मी त्यांच्यावर 90 दिवसांसाठी रेसिप्रोकल टॅरिफ स्थगित करत आहे. या कालावधीत, 10 टक्के मूळ कर कायम राहील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. हा निर्णय ताबडतोब लागू झाला. तथापि, ट्रम्प यांनी त्या 75 देशांची यादी जाहीर केली नाही.

वाढीव आयात शुल्क का थांबवले?
वाढीव आयात शुल्क थांबवण्याचे कारण विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘जगभरातील लोक घाबरले होते. अनिश्चितता निर्माण झाली होती. ट्रम्पच्या शुल्काला प्रतिसाद म्हणून अद्याप कोणतीही घोषणा न करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश होता. अशा परिस्थितीत, 9 एप्रिलपासून भारतावर लादण्यात आलेला 26 टक्के कर थांबवण्यात आला आहे. ट्रम्प यांनी 25 टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादलेल्या कॅनडा आणि मेक्सिकोवरही 10 टक्के कर लावला आहे.