ट्रम्प बचावले, पण…

0
16

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि या वर्षअखेरीस होणाऱ्या तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला असला, तरी त्यांच्यावरील हल्ल्याने जगातील सर्वाधिक संरक्षित व्यक्तींना सुरक्षा पुरवणाऱ्या व त्याबद्दल जगात फार गाजावाजा असलेल्या अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हीसची मात्र पुरती पोलखोल केली आहे. शिवाय हल्लेखोर एखादा सराईत गुन्हेगार नसून अवघ्या वीस वर्षांचा कोवळा मुलगा होता हे तर अधिकच अचंब्यात टाकणारे आहे. पेनसिल्वेनियातील बटलरमध्ये ट्रम्प आपल्या प्रचारसभेत बोलत असताना जवळच्या इमारतीच्या छपरावरून सरपटत हा मुलगा पुढे सरसावला आणि त्याने आपल्या एआर 15 सेमीऑटोमॅटिक रायफलने तेथून थेट ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी ट्रम्प यांनी समोरच्या स्क्रीनवर लावलेला बेकायदेशीर निर्वासितांचा तक्ता पाहण्यासाठी मान किंचित वळवल्याने, तेवढ्यात त्या सुसाटत आलेल्या गोळीचा निशाणा हुकला आणि ती ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या पाळीचा वरचा टवका उडवून गेली. त्याने लागोपाठ झाडलेल्या गोळ्याही ट्रम्प खाली वाकल्याने त्यांना लागू शकल्या नाहीत व ते बचावले, परंतु आपल्या पत्नी व दोन मुलींना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रेक्षकाचा मात्र नाहक बळी गेला. जगातील सर्वांत जास्त सुरक्षा व्यवस्था असलेल्या एका नेत्यावर एक विशीतला किरकोळ मुलगा प्राणघातक हल्ला करू शकतो हेच मुळात अतिशय धक्कादायक आहे. आता ह्या मुलासंबंधी शाळेत तो गणितात फार हुशार होता व तेथील प्रज्ञाशोध परीक्षेत त्याने पाचशे डॉलरचे बक्षीसही कमावले होते अशी माहिती समोर आलेली आहे. शाळकरी जीवनात तो एकाकी असायचा, इतर मुले त्याला छळायचे वगैरे गोष्टी आता चर्चिल्या जात असल्या, तरी मुळात त्याने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधायचे कारणच काय हे कोडे मात्र उलगडलेले नाही. त्याच्या राजकीय मतांचा शोध घेण्याचा प्रयत्न एफबीआयने केला, त्यात त्याने रिपब्लिकन म्हणूनच आपली नोंदणी केलेली होती असे आढळले आहे. मग रिपब्लिकन पक्षाच्याच उमेदवारावर त्याने गोळी झाडायचे कारण काय ह्या प्रश्नाचा शोध एफबीआय घ्यायला गेली, तेव्हा त्याने वयाच्या सतराव्या वर्षी डेमोक्रॅट्सनाही छोटीशी देणगी दिली होती असे समोर आले. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर कोणतीही राजकीय चर्चा आढळत नाही वा आक्रमक विधाने दिसून येत नाहीत. मग एकाएकी त्याने थेट ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्याचे कारण काय असेल हे खरोखरच कोडे आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या हत्येमागे नेमके कोण होते असा प्रश्न आता चर्चिला जाणे व त्यावर विविध मतमतांतरे व्यक्त होणे साहजिक आहे. हल्ला कोणी केला ह्याबरोबरच तो होऊ दिला गेला कसा हाही चर्चेचा विषय ठरला आहे, कारण शेजारच्या इमारतीवरून हा मुलगा सरपटताना सभेतील काही उपस्थितांनी पाहिले होते व पोलिसांचेही त्याकडे लक्ष वेधले होते. तसे व्हिडिओही समोर आलेले आहेत. मग पोलीस व सिक्रेट सर्व्हीसचे त्याकडे दुर्लक्ष कसे झाले, सभेच्या आजूबाजूच्या ठिकाणांची पूर्वछाननी कशी झाली नव्हती, हल्लेखोर गोळ्या झाडण्याआधीच त्याच्यावर निशाणा का साधला गेला नाही वगैरे अनेक प्रश्न उभे झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेले असताना ट्रम्प यांनी प्रसंगावधान राखून झट्दिशी खाली वाकणे व सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटांनी गराडा घालून मानवी कवच पुरवताच हात वर उंचावत आपल्या समर्थकांना आपण सुखरूप असल्याचे सांगणे हे त्यांच्या धैर्याचे दर्शन घडवून गेले आहे. आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ह्या घटनेचा परिणाम किती होतो हे आता पाहावे लागेल. ट्रम्प यांच्यावरील ह्या हल्ल्याने 1963 मधील जॉन एफ. केनेडींच्या हत्येच्या आठवणी ठळक केल्या. तेव्हा ली हार्वी ओस्वाल्डने अशाच प्रकारे गोळ्या झाडल्या होत्या. अमेरिकेतील खुल्या गन कल्चरमुळे आजवर असंख्यांचे बळी गेले आहेत. शाळा, मॉलमधून अंदाधुंद गोळीबाराच्या घटना तर सतत होत असतात, परंतु तरीही बंदूक बाळगण्यास बंदी घालण्याची हिंमत एकही राजकीय पक्ष अद्याप दाखवू शकलेला नाही. तसे करणे म्हणजे तो व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला ठरेल असे तेथे मानले जात आले आहे. अमेरिका हा जगातील मोजक्याच देशांपैकी एक असा देश आहे की जेथे शस्त्र बाळगणे हा घटनात्मक अधिकार मानला जातो. अनेक हत्याकांडे होऊनही लोक आपला हा घटनादत्त अधिकार सोडायला तयार नाहीत. परंतु आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविलेल्या व्यक्तीवर एका वीस वर्षांच्या मुलाने प्राणघातक हल्ला चढविण्याच्या ह्या घटनेने ह्या गनकल्चरवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली बंदुका बाळगण्याचे हे फॅड आता तरी संपुष्टात येईल काय?