ट्रम्प की कमला?

0
15

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची अत्यंत चुरशीची निवडणूक आज होते आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा त्या देशाच्या अध्यक्षपदी सन्मानाने विराजमान होणार की मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा बहुमान पटकावणार ह्याबाबत विलक्षण उत्सुकता आहे. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटस्‌‍ आपापले बालेकिल्ले राखण्यात यशस्वी होतील अशी अटकळ असते. कुतूहल असते ते ज्यांना ‘स्विंग स्टेटस्‌‍’ संबोधले जाते, त्या प्रांतांविषयी. अरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनिसिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन ही राज्ये अशी स्विंग स्टेटस्‌‍ गणली जातात. तेथील मतदार यावेळी काय कौल देतात, कोणाकडे झुकतात त्याबाबत पैजा लावल्या जात आहेत. बाकी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ज्या राज्यांतून बहुमत घेत आलेले आहेत, अशा रेड स्टेटस्‌‍ किंवा डेमॉक्रॅटस्‌‍ जिथून सातत्याने विजयी होत आले आहेत अशा ब्लू स्टेटस्‌‍ यांचे निकाल तसे अपेक्षितच म्हणावे लागतील.. त्यामुळे खरी चर्चा रंगली आहे ती ह्या स्विंग स्टेटस्‌‍ संदर्भात. गेल्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना नाकारून ज्यो बायडन यांच्या पारड्यात अमेरिकी जनतेने आपली मते घातली. परंतु ट्रम्प समर्थकांनी शेवटपर्यंत आपला पराभव मान्य केला नाही. अमेरिकी काँग्रेसमध्ये घुसून दंगल करण्यापर्यंत ट्रम्प समर्थकांची मजल गेली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत न भूतो असा तो प्रकार होता. ज्यो बायडन यांच्या विजयात काटे पेरण्याचा पुरेपूर प्रयत्न ट्रम्प यांनी त्यावेळी केला. त्याच्या आधल्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ च्या हाकेला प्रतिसाद देत अमेरिकी जनतेने मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठिंबा दर्शविला होता आणि राष्ट्राध्यक्षपदी बसवले होते. यावेळी मात्र ट्रम्प यांच्या फेरनिवडीबाबत अमेरिकेत मतेमतांतरे दिसतात. मात्र, ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेवेळी त्यांच्यावर वेळोवेळी झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या प्रकारांनी ह्या निवडणुकीची समीकरणेच बदलून टाकली आहेत. याउलट भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी विविध जनमत पाहण्यांमध्ये ट्रम्प यांच्यावर मात केल्याचे पाहायला मिळते आहे. रॉयटर्सने केलेल्या पाहणीत कमला हॅरीस यांच्या बाजूने 44 टक्के जनतेने, तर ट्रम्प यांच्या बाजूने एक टक्का कमी म्हणजे 43 टक्के जनतेने कौल दिल्याचे आढळून आले आहे. यापूर्वीच्या म्हणजे गेल्या जुलैपासूनच्या पाहण्यांमध्ये कमला हॅरीस यांचे पारडे वर दिसत आले आहे. पण सध्याच्या अगदी ताज्या पाहणीत स्विंग स्टेटस्‌‍चा विचार करता ॲरिझोना, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रम्प यांचे पारडे बऱ्यापैकी वर दिसते. त्यामुळे ह्या निवडणुकीचा निकाल काय लागेल हे सांगता येत नाही. कमला हॅरीस यांनी आपली प्रचारफेरी सकारात्मक ठेवली आहे. ट्रम्प मात्र आपल्या सवयीप्रमाणे अनेकदा घसरले. परंतु त्यांच्यावरील हल्ल्यांनी त्यांच्याप्रती सहानुभूतीची लाटही निर्माण केलेली आहे. महासत्ता अमेरिकेची धुरा कोणाच्या हाती येते त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष असते, कारण संपूर्ण जगावर परिणाम घडवणारी ती घटना असते. सध्या रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेले युद्ध आणि युक्रेनला अमेरिकेच्या ज्यो बायडन प्रशासनाने दिलेला पाठिंबा, दुसरीकडे, इस्रायल – हमास संघर्ष आणि आता त्यात उतरलेल्या इराणविरुद्ध इस्रायलला बायडन यांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता, नव्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका काय राहील ह्याकडे जगाचे लक्ष आहे. अमेरिकेची निवडणूक ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. स्थानिक अमेरिकी नागरिकांप्रमाणेच तेथे परदेशांतून येऊन स्थायिक झालेल्या निर्वासितांची भूमिकाही महत्त्वाची असते. कमला हॅरीस ह्या मूळ भारतीय वंशाच्या आणि आफ्रिकेशीही त्यांचा संबंध आला आहे. त्यामुळे स्थलांतरित अमेरिकी नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळतो का हे पाहावे लागेल. ट्रम्प यांची नीती गेल्यावेळी प्रत्ययास आली होती, परंतु त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ची मोहिनी असलेला मोठा वर्ग अमेरिकेत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांचीही काही कमी नाही. ह्या सगळ्या रणधुमाळीत ही निवडणूक होते आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था हा जनतेसाठी सध्या सर्वांत चिंतेचा विषय आहे. आपल्या मतदानाचा तो एक महत्त्वाचा निकष असल्याचे दर दहापैकी आठ मतदारांनी सर्वेक्षणांत सांगितले आहे. स्थलांतरण हाही अमेरिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असतो. जनतेसाठी आरोग्यसुविधा, गर्भपाताचा मुद्दा, अमेरिकेतील वाढती गुन्हेगारी, वंश आणि वर्णभेद, इथपासून ते अगदी हवामान बदलासंदर्भातील नीतीपर्यंत असंख्य विषयांचा उहापोह दोन्ही उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झाला आहे. त्यातून मतदार कोणाची निवड करणार, कोणावर विश्वास व्यक्त करणार ते आज ठरेल. जगाची नजर ह्या निवडणुकीवर नक्कीच खिळलेली आहे.