ट्रम्प अन्‌‍ मस्क यांच्या विरोधात उफाळला रोष

0
2

>> अमेरिकेत 1200 ठिकाणी ‘हँड्स ऑफ’ आंदोलन; विविध मुद्द्यांवरून निदर्शने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी शनिवारी अमेरिकेत 1200 हून अधिक मोर्चे काढण्यात आले. सरकारी नोकऱ्यांमधील कपात, अर्थव्यवस्था आणि मानवाधिकार यासारख्या मुद्द्यांवर सरकारच्या निर्णयांचा निषेध करणे हा या रॅलींचा उद्देश होता. या आंदोलनाला ‘हँड्स ऑफ’ असे नाव देण्यात आले. हात बंद म्हणजे ‘आमच्या हक्कांपासून दूर राहा.’ आंदोलकांना त्यांच्या अधिकारांवर कुणाचेही नियंत्रण नको आहे, हे दाखवणे हा या घोषणेचा उद्देश होता. या आंदोलनात दीडशेहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू + स्वयंसेवक, माजी सैनिक आणि निवडणूक कर्मचारी यांचा समावेश होता. हा निषेध वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल मॉल, स्टेट कॅपिटल आणि सर्व 50 राज्यांमध्ये झाला.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क यांच्या विरोधात अमेरिकेत काल रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी निदर्शने केली. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकन नागरिक ‘हँड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले. सरकारी नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले.
काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ आता अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.

तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, त्याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला एलॉन मस्क हे अमेरिकेतील ट्रम्प सरकारमधील सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आहेत. सरकारी यंत्रणा संकुचित केल्याने करदात्यांची अब्जावधी डॉलर्सची बचत होईल, असा त्यांचा दावा आहे. मस्क यांच्या सल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या धोरणांचा विरोध करत निदर्शकांनी आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच काही निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलतील, असेही म्हटले आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली विभागाने काही निर्णय घेतले आणि त्यामध्ये सामाजिक सुरक्षा प्रशासन प्रादेशिक कार्यालये बंद करणे, स्थलांतरितांना निर्वासित करणे, ट्रान्सजेंडर संरक्षण आणि आरोग्य कार्यक्रमांसाठी निधी कमी करणे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आल्यामुळे अमेरिकेतील नागरिकांनी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.