ट्रकचालकांच्या संपावर तोडगा; आजपासून वाहतूक सुरळीत?

0
15

>> केंद्रीय गृहसचिवांकडून संप मागे घेण्याचे आवाहन; संपामुळे पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा बंद; इंधन तुटवड्यामुळे नागरिक हैराण

‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारपासून पुकारलेला संप काल देखील सुरुच राहिला. या संपावर रात्री उशिरा तोडगा निघाला. केंद्रीय गृह सचिवांसोबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. या चर्चेअंती नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे आता मालवाहतूकदार, इंधन टँकर चालकांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. बुधवारपासून मालवाहतूक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने चालकांना वाहतूक तात्काळ सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

मागील दोन दिवसांपासून मालवाहतूकदार, टँकरचालकांचा संप सुरू असल्याने अनेक राज्यांत इंधनापासून ते भाजीपाला, अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. देशभरात ट्रकचालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते. या संपाची धग तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मालवाहतूकदारांच्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत संपाबाबत अखेर तोडगा काढण्यात आला.

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बल मलकित सिंग यांनी म्हटले की, गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कलम 106(2) अद्याप लागू केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, असेही आश्वासन गृहसचिवांनी दिले असल्याचे सिंग यांनी म्हटले. कायदा लागू होणार नसल्याने ट्रकचालकांनी कोणतीही भीती न बाळगता वाहतूक सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नव्या कायद्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर
अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, असे या नव्या कायद्याला विरोध करणाऱ्या वाहनचालकांचे म्हणणे आहे. मात्र अपघातावेळी चालक घटनास्थळी थांबले, तर जमाव त्यांच्यावर हल्ला करेल. परिणामी चालकांसमोर इकडे आड, तिकडे विहिर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवा कायदा अद्याप लागू नाही : केंद्रीय गृहसचिव
अखिल भारतीय मालवाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींची गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत काल बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी नवीन कायदा अद्याप लागू करण्यात आला नाही, अशी माहिती दिली. अखिल भारतीय काँग्रेस आणि सगळ्या चालकांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

गोव्यातील आजच्या संपाचे काय?

‘हिट अँड रन’ प्रकरणी नव्या कायद्यातील कठोर शिक्षेविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले आहे. याचाच भाग म्हणून मंगळवारी मध्यरात्री 12 ते बुधवारी मध्यरात्री 12 पर्यंत गोव्यातील ट्रचालकांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला रात्री उशिरा केंद्रीय पातळीवर या संपाबाबत तोडगा निघाला आहे. केंद्रीय गृहसचिवांनी नवा कायदा लागू झालेला नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने ट्रकचालकांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गोव्यातील आजच्या संपाबाबत संभ्रमावस्था कायम आहे.