जानेवारी महिन्यातील २२ तारखेपासून पोर्तुगालमधील गोंडोमार येथे होणार्या ऑलिम्पिक सांघिक पात्रता स्पर्धेपूर्वी भारताचा टेबल टेनिस संघ आपल्या जर्मन प्रतिस्पर्ध्यांसह सराव करणार आहे. भारताच्या पुरुष संघात जी. साथियान (३०), शरथ कमल (३४) या दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये संघ म्हणून प्रथमच पात्रता मिळविण्याची नामी संधी भारताला प्राप्त झाली आहे.
टेबल टेनिस क्रमवारीत भारतीय संघ आठव्या स्थानी असून पात्रता स्पर्धेच्या केवळ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली तरी भारतीय संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहे. वेगाने प्रगती केलेल्या क्रोएशिया व हॉंगकॉंगसारख्या देशांचे आव्हान भारतासमोर असेल, परंतु, खेळाडूंच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे व फॉर्ममुळे भारतीय संघ निश्चितच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरेल, अशी आशा साथियान याने व्यक्त केली आहे. सध्या सुरु असलेल्या राष्ष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरानंतर भारतीय संघ १३ ते २० जानेवारी या कालावधीत जर्मनीतील डसेलडर्फ येथे त्यांच्या राष्ट्रीय संघासोबत सराव करणार आहे.
दक्षिण कोरियात आठवडाभर सराव केल्यानंतर २६ वर्षीय साथियान शरथ, हरमीत देसाई व इतरांसह सराव करण्यासाठी नुकताच राष्ट्रीय शिबिरात दाखल झाला. कोरियातील प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे त्याने सांगितले. जागतिक क्रमवारीत टॉप २०मधील दोन खेळाडूंशी कोरियात सराव करण्याची संधी मिळाली. कोरियाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राने दिलेले सहकार्य वाखाणण्याजोगे असल्याचे सांगतानाच त्याने त्यांच्या पायाभूत सुविधांचेदेखील कौतुक केले. चेन्नईचा साथियान आज बुधवारी जर्मन कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहभागी होण्यासाठी जर्मनीला निघणार असून या स्पर्धेत तो एएसव्ही ग्रनवेटरबॅच संघाकडून खेळतो.