>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो; ‘गोवा माईल्स’कडून साडेआठ कोटींचा महसूल
राज्यातील सुमारे 18 हजार टॅक्सी व्यावसायिक हे कर भरत नसल्याने गेल्या 5 वर्षांत गोवा सरकारला 500 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागले आहे, अशी माहिती काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोवा विधानसभेत दिली. काल प्रश्नोत्तराच्या तासाला पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या वेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
2018 साली राज्यात गोवा माईल्स ही ॲपआधारित टॅक्सीसेवा सुरू झाल्यापासून 1560 टॅक्सी व्यावसायिकांनी त्याखाली नोंदणी केली असून, त्यांनी जीएसटीच्या रुपात 6.96 कोटी रुपये भरले आहेत, तर टीडीएसच्या रुपात सरकारला 1.5 कोटी रुपये जमा केले आहेत, असे गुदिन्हो म्हणाले.
गोवा माईल्स या ॲपआधारित टॅक्सीसेवेला मनोहर विमानतळावर सरकारने काऊंटर सुरू करुन दिल्याने स्थानिक टॅक्सीचालकांना ग्राहक मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हे काऊंटर केले जावे, अशी मागणी प्रवीण आर्लेकर यांनी केली.
त्याव उत्तर देताना गुदिन्हो म्हणाले की, गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकांपैकी 95 टक्के हे गोमंतकीय असून, त्यापैकी 80 टक्के हे पेडणे मतदारसंघातील आहेत. यावेळी गुदिन्हो यांनी या टॅक्सीचालकांपैकी काही टॅक्सीचालकांची नावेही सभागृहात वाचून दाखवली. मात्र, गुदिन्हो यांनी केलेला वरील दावा खोटा असल्याचा आरोप यावेळी आर्लेकर यांनी केला.