>> पर्वरीतील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय; गोवा माईल्स काऊंटर बंदची मागणी सरकारने फेटाळली
विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांची काल पर्वरीतील मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत टॅक्सी व्यावसायिकांच्या 6 पैकी 5 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. मात्र मनोहर विमानतळावरील ‘गोवा माईल्स’चा काऊंटर बंद करण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली. दुसऱ्या बाजूला, सरकारने टॅक्सी व्यावसायिकांच्या बहुतांश मागण्या केल्या असल्या तरी ते अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. सरकारकडून 5 मागण्या मान्य केल्याची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पेडणे येथील टॅक्सी व्यावसायिकांनी गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातील टॅक्सीचालकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी टॅक्सी व्यावसायिकांशी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने सोमवारी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. पर्वरी येथे मंत्रालयात सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीला पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचीही उपस्थिती होती.
राज्यात गोवा माईल्स कॅब ॲग्रिगेटर सुरू करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. गोवा माईल्सकडून चांगली आणि दर्जेदार सेवा दिली जात आहे. गोवा माईल्समध्ये सरकारने कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तसेच, राज्य सरकारला गोवा माईल्सकडून जीएसटी भरला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पेडणे येथील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना मनोहर विमानतळावर काऊंटर देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहे, अशी माहिती आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पेडण्यातील सुमारे 300 टॅक्सी कुठल्याही काऊंटरशी संलग्न नाहीत. त्या टॅक्सींना सामावून घेतले जाणार आहे, असेही आर्लेकर यांनी सांगितले.
टॅक्सी व्यावसायिकांच्या 6 मागण्या कोणत्या?
मोपातील मनोहर विमानतळावर स्थानिकांना टॅक्सी काऊंटर मोफत द्यावा.
पार्किंग शुल्क आणि पिकअप शुल्कात केलेली वाढ मागे घ्यावी.
मोपा विमानतळावरील सर्व बेकायदेशीर खासगी टॅक्सी, खासगी भाडे सेवा आणि कॅब भाड्याने देणे बंद करावे.
मनोहर विमानतळाचा सध्या सुरू असलेला जुना रस्ता स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी खुला ठेवा.
टॅक्सी व्यावसायिकांसाठी मोपा विमानतळ लिंक रोडवर टोल आकारला जाऊ नये.
विमानतळावरील गोवा माईल्सचा कॅब ॲग्रिगेटर काऊंटर काढावा.
‘ती’ मागणी मान्य करणे अशक्य : मुख्यमंत्री
गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या टॅक्सी व्यावसायिकांच्या 6 पैकी 5 मागण्या मान्य केल्या आहेत. गोवा माईल्स काउंटर बंद करण्याच्या मागणी मान्य करता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
टॅक्सी व्यावसायिक लेखी हमीसाठी अडले
राज्य सरकारने टॅक्सी व्यावसायिकांच्या बहुतांश मागण्या मान्य करून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे; मात्र तरीही ते आंदोलनावर अडून आहेत. जोपर्यंत राज्य सरकारकडून लिखित स्वरूपात पाचही मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे टॅक्सी व्यावसायिकांनी काल पेडण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आजही आंदोलन सुरुच राहणार
गेले पाच दिवस हे आंदोलन सुरू असून, हे आंदोलन आता मंगळवारी देखील सुरू राहणार आहे. यापूर्वी विविध मागण्यांसाठी आंदोलन केली; मात्र सरकार वेळोवेळी आम्हाला झुलवत ठेवते. आमच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीत 5 मागण्या मान्य केल्याचे लेखी हमीपत्र मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असेही आंदोलनकर्त्या टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले.