टॅक्सीचालकांच्या आंदोलनात राजकारण

0
4

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आरोप

>> चर्चेसाठी आलेले टॅक्सीचालक माघारी

पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांच्या प्रश्नाला काहीजण राजकीय वळण देत असल्याचा आरोप काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. या लोकांना या प्रश्नांपासून राजकीय फायदा उठवायचा आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. आपण आजच्या चर्चेसाठी फक्त पेडणे येथील टॅक्सीचालकांना बोलावले होते. कारण चर्चा फक्त पेडणे तालुक्यातील टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर होणार होती, असे सावंत यांनी सांगितले.

पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांचा प्रश्न शुक्रवारी (काल) मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सुटेल अशी जी आशा होती ती मावळली. पेडण्याहून हे टॅक्सीचालक आपले म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारी पणजीला आले मात्र त्यांना भेटायला आलेल्या 25 टॅक्सीचालकांपैकी मुख्यमंत्र्यांनी केवळ 10 टॅक्सीचालकांशीच चर्चेचा प्रस्ताव ठेवल्यानंतर संतप्त टॅक्सीचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील अधिकृत निवासस्थानाकडून काढता पाय घेतल्याने चर्चा होऊ शकली नाही.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आता सुद्धा मी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तसेच त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यास तयार आहे. आपण शुल्क कमी केले असून पार्किंग वेळ वाढवून दोन्ही प्रश्न सोडवले. तसेच मोपवर ब्ल्यू कॅबही दिल्याचे सांगितले.

अन्य भागांतील टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नांवर आपण अन्य आमदारांशी बोलणी करीत असून त्यांचे प्रश्नही लवकरच सुटणार आहेत, असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पेडणे येथील टॅक्सीचालक येणार असल्याने निवासस्थानी सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.

टॅक्सीचालक नाराज

दरम्यान, पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांनी नापसंती व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आम्हाला 25 जणांचे शिष्टमंडळ घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही आल्तिनो येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी आम्हाला आपण 10 जणांच्या शिष्टमंडळालाच भेटणार असल्याचे सांगितले. हा अन्याय असून त्यामुळे आम्ही त्यांना न भेटण्याचा निर्णय घेतल्याचे टॅक्सीवाल्यांनी सांगितले.