
>> डॉ. मनमोहन सिंग यांना गुंतवल्याबद्दल सीबीआयवर ताशेरे
दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गाजलेल्या टूजी घोटाळ्याप्रकरणी निवाडा दिला असून या प्रकरणातील संशयित माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, द्रमुकच्या नेत्या खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व संशयित आरोपींना या न्यायालयाने निर्दोष ठरविले. संपूर्ण देशात या प्रकरणी देशभरात कॉंग्रेसवर टीका झाली होती. सीबीआयला न्यायालयात संशयितांविरुध्द सबळ पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
ए. राजा यांना आरोपी ठरवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव या प्रकरणात ओढवल्याबद्दल न्यायालयाने सीबीआयवर कडक ताशेरे ओढले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए- २ सरकारच्या काळात टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता. या घोटाळ्यामुळे सरकारचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष महालेखापालांच्या (कॅग) अहवालात काढण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही तडा गेला होता. या निवाड्यासाठी काल न्यायालयात ए. राजा व कनिमोळी उपस्थित होते. निवाड्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या ७ जानेवारी २००८च्या प्रसिध्दी अधिसूचनेत केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी बदल केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता. २०११मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. याप्रकरणात या न्यायालयाने ए. राजा व कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर, लाच घेणे अशा कलमांखाली आरोप निश्चित केले होते.