सलामीवीर कुशल मेंडीसच्या वेगवान अर्धशतकानंतर दासुन शनका व थिसारा परेरा यांच्या फटकेबाजीच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या टी -२० सामन्यात बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह लंकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
श्रीलंकेने या सामन्यात विजयासाठी १९४ धावा करताना आपल्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम नोंदविला. तत्पूर्वी, बांगलादेशने मुश्फिकुर रहीमच्या नाबाद ६६ धावांच्या जोरावर टी-२० क्रिकेटमधील आपली सर्वाधिक धावसंख्या केली. जायबंदी कुशल परेराची जागा घेतलेल्या कुशल मेंडीसने आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावताना केवळ २७ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा जमवून लंकेच्या विजयाचा पाया रचला. त्याने गुणथिलका (३०) याच्यासह लंकेला २९ चेंडूंत ५३ धावांची सलामी दिली. या आक्रमक सलामीवीनंतर कळस चढविण्याचे काम शनका व थिसारा यांनी केले. तत्पूर्वी, बांगलादेशने फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर १९३ धावा फलकावर लगावल्या. बांगलादेशकडून या सामन्याद्वारे झाकिर हसन, अफिफ हुसेन, अरिफुल हक व नझमुल इस्लाम यांनी आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पदार्पण केले. लंकेकडून शेहान मधुशंकाने आपल्या टी-२० कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. मालिकेतील दुसरा सामना रविवार १८ रोजी मिरपूर येथे खेळविला जाणार आहे.
धावफलक
बांगलादेश ः झाकिर हसन त्रि. गो. गुणथिलका १०, सौम्य सरकार पायचीत गो. जीवन ५१, मुश्फिकुर रहीम नाबाद ६६, आफिफ हुसेन झे. डिकवेला गो. जीवन ०, महमुदुल्ला झे. धनंजया गो. उदाना ४३, सब्बीर रहमान त्रि. गो. परेरा १, अरिफुल हक नाबाद १, अवांतर २१, एकूण २० षटकांत ५ बाद १९३
गोलंदाजी ः शेहान मधुशंका ३-०-३९-०, दनुष्का गुणथिलका २-०-१६-१, इसुरू उदाना ४-०-४५-१, थिसारा परेरा ४-०-३६-१, अकिला धनंजया ४-०-३२-०, जीवन मेंडीस ३-०-२१-२
श्रीलंका ः कुशल मेंडीस झे. सरकार गो. अफिफ ५३, दनुष्का गुणथिलका यष्टिचीत रहीम गो. नझमुल ३०, उपुल थरंगा झे. अफिफ गो. नझमुल ४, दासुन शनका नाबाद ४२, निरोशन डिकवेला झे. सैफुद्दिन गो. रुबेल ११, थिसारा परेरा नाबाद ३९, अवांतर १५, एकूण १६.४ षटकांत ४ बाद १९४. गोलंदाजी ः नझमुल इस्लाम ४-०-२५-२, मोहम्मद सैफुद्दिन २-०-३३-०, महमुदुल्ला २-०-२३-०, रुबेल हुसेन ३.४-०-५२-१, मुस्तफिझुर रहमान ३-०-३२-०, अफिफ हुसेन २-०-२६-१