टी-२० मालिकेतही भारताचा विजयारंभ

0
71

>> यजमान दक्षिण आफ्रिकेवर २८ धावांनी मात

वॉंडरर्स मैदानावर काल रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेवर २८ धावांनी विजय मिळवला. शिखर धवनचे आक्रमक अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमारचे पाच बळी हे या विजयाचे मुख्य वैशिष्ट्‌य ठरले.
भारताने द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांचा डाव ९ बाद १७५ धावांवर रोखण्यात गोलंदाजांना यश आले. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला सुरुवातीलाच तीन धक्के बसले. दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ४८ अशी नाजूक झाली होती. त्यानंतर बेहार्दिन आणि हेंड्रिक्स यांनी ८१ धावांची भागीदारी केली. भारतासाठी धोकादायक बनत चाललेली ही जोडी युजवेंद्र चहलने फोडली. त्याने बेहार्दिनला बाद केले. त्यानंतर धोकादायक ठरत चाललेल्या हेंड्रिक्सला भुवनेश्वरने बाद केले. हेंड्रिक्सने ५० चेंडूत ७० धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वरने धारधार गोलंदाजी करत २४ धावांमध्ये ५ बळी घेतले तर उनाडकट, पंड्या आणि चहलने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताची सुरुवात वेगवान तसेच खराब झाली. भारताला २३ धावांवर रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानं ९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. त्यानंतर शिखर धवनने डावाची सूत्रे हाती घेत आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. शिखरने बाद होण्यापूर्वी ३९ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली. विराट कोहली (२६), सुरेश रैना (१५), मनीष पांडे (२९), धोनी (१६) आणि हार्दिक पांड्याच्या नाबाद १३ धावांच्या बळावर भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्याद्वारे वेगवान गोलंदाज ज्युनियर डाला व यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन यांनी आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पदार्पण केले. मालिकेतील दुसरा सामना सेंच्युरियनवर २१ फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार आहे.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. क्लासेन गो. डाला २१ (९ चेंडू, २ चौकार, २ षटकार), शिखर धवन झे. क्लासेन गो. फेलुकवायो ७२ (३९ चेंडू, १० चौकार, २ षटकार), सुरेश रैना झे. व गो. डाला १५ (७ चेंडू, २ चौकार, १ षटकार), विराट कोहली पायचीत गो. शम्सी २६ (२० चेंडू, २ चौकार, १ षटकार), मनीष पांडे नाबाद २९ (२७ चेंडू, १ षटकार), महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. मॉरिस १६ (११ चेंडू, २ चौकार), हार्दिक पंड्या नाबाद १३ (७ चेंडू, २ चौकार), अवांतर ११, एकूण २० षटकांत ५ बाद २०३
गोलंदाजी ः डॅन पॅटरसन ४-०-४८-०, ज्युनियर डाला ४-०-४७-२, ख्रिस मॉरिस ४-०-३९-१, तबरेझ शम्सी ४-०-३७-१, जेजे स्मट्‌स २-०-१४-०, आंदिले फेलुकवायो २-०-१६-१
दक्षिण आफ्रिका ः जॉन जॉन स्मट्‌स झे.धवन गो. कुमार १४ (९ चेंडू, ३ चौकार), रिझा हेंड्रिक्स झे. धोनी गो. कुमार ७० (५० चेंडू, ८ चौकार, १ षटकार), जेपी ड्युमिनी झे. रैना गो. कुमार ३, डेव्हिड मिलर झे. धवन गो. पंड्या ९, फरहान बेहार्दिन झे. पांडे गो. चहल ३९ (२७ चेंडू, ३ चौकार, २ षटकार), हेन्रिक क्लासेन झे. रैना गो. कुमार १६ (८ चेंडू, १ चौकार, १ षटकार), आंदिले फेलुकवायो झे. चहल गो. उनाडकट १३ (८ चेंडू, २ चौकार), ख्रिस मॉरिस झे. रैना गो. कुमार ०, डॅन पॅटरसन धावबाद १, ज्युनियर डाला नाबाद २, तबरेझ शम्सी नाबाद ०, अवांतर ८, एकूण २० षटकांत ९ बाद १७५
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-२४-५, जयदेव उनाडकट ४-०-३३-१, जसप्रीत बुमराह ४-०-३२-०, हार्दिक पंड्या ४-०-४५-१, युजवेंद्र चहल ४-०-३९-१