टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा फडशा पाडून भारताने काल जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. रविवारी झालेल्या मालिकेतील तिसर्या सामन्यात लंकेचा ५ गड्यांनी पराभव करत टीम इंडियाने लंकेला विजयापासून वंचित ठेवले होते. मालिका सुरू होण्यापूर्वी भारताच्या खात्यात ११९ गुण होते. आता भारताचे १२१ गुण झाले आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड व वेस्ट इंडीज यांना मागे टाकून भारताने पाचव्या स्थानावरून थेट दुसरे स्थान प्राप्त केले आहे. पाकिस्तानचा संघ १२४ गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
फलंदाजांमध्ये रोहित शर्मा व लोकेश राहुल या सलामीवीरांनी मोठी झेप घेतली आहे. या दोघांनी मालिकेत खोर्याने धावा जमविल्या होत्या. मालिकेतील १६२ धावांच्या बळावर रोहितने सहा स्थानांची उडी घेत चौदावा क्रमांक मिळविला आहे. दोन अर्धशतकांसह १५४ धावा जमवलेल्या राहुलने २३ क्रमांकांची प्रगती साधत थेट चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरोन फिंच व पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू इमाद वासिम अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत. फिंच याने विंडीजचा सलामीवीर इविन लुईस याला पछाडताना पहिला क्रमांक प्राप्त केला. वैयक्तिक कारणास्तव श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत न खेळलेल्या कोहलीची तिसर्या स्थानी घसरण झाली आहे.
आयसीसीच्या नियमानुसार एका टी-२० सामन्यासाठी एकूण गुणांच्या २ टक्के गुण गमवावे लागतात. मालिकेपूर्वी विराटचे ८२४ गुण होते. ४८ गुणांचा तोटा झाल्याने त्याच्या नावावर ७७६ गुण राहिले आहेत. एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला विराट टी-२० क्रमवारीत फिंचपेत्रा केवळ ८ गुणांनी व लुईसपेक्षा केवळ ४ गुणांनी मागे आहे. लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी-२० सामन्यात बळी मिळविण्यात अपयश आल्याने तसेच तिसर्या सामन्याला मुकल्याने जसप्रीत बुमराह याची तिसर्या स्थानी घसरण झाली आहे. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान याने कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळविले आहे. फिंच व इमाद यांनी यापूर्वीेेदेखील टी-२० क्रमवारीत पहिले स्थान भूषविले आहे, फिंच १२१ सामने व ३६८ गिवस पहिल्या स्थानावर होता. तर इमाद १५ सामने व १३२ दिवस पहिले स्थान टिकवून होता. गोलंदाजांचा विचार केल्यास मालिकेत ८ बळी घेतलेल्या युजवेंद्र चहलने १४ स्थानांची मोठी मजल मारताना १६व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. हार्दिक पंड्या (१६वे स्थान, + ४०), कुलदीप यादव (६४वे स्थान, + ४८) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. मालिकेत १०० धावा जमवून श्रीलंकेच्या कुशल परेरा याने फलंदाजी क्रमवारीत ८ स्थानांची वर सरकताना तिसावा कप उपुल थरंगाने ३६ स्थानांची सुधारणा करत १०५वा क्रमांक मिळविला आहे. गोलंदाजीत थिसारा परेराने ७०वे स्थान प्राप्त केले आहे.