टीम इंडिया मजबूत स्थितीत

0
107

>> मयंक अगरवालचे शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने मजबूत स्थिती गाठताना ३ बाद २७३ धावांपर्यंत मजल मारली आहे. मयंक अगरवालचे सलग दुसर्‍या कसोटीतील शतक तसेच चेतेश्‍वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकांमुळे भारताने पहिला दिवस आपल्या नावे केला.

नाणेफेकीच्या कौलाच्या बाबतीत विराट कोहली सलग दुसर्‍यांदा सुदैवी ठरला. खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करेल हे जाणूनही त्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाहुण्यांचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने आपल्या वेगाच्या जोरावर रोहित शर्माचा काटा स्वस्तात काढला. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक ठोकलेल्या रोहितला केवळ १४ धावा करता आल्या. दुसर्‍या टोकाने व्हर्नोन फिलेंडरने अचूक टप्पा राखत फलंदाजांना जखडून ठेवले. परंतु, त्याच्याकडे भारतीय खेळपट्‌ट्यांसाठी आवश्यक असलेली गती नसल्यामुळे मयंक व पुजाराला त्याला खेळताना फारशी अडचण जाणवली नाही. ड्युप्लेसीने नवोदित नॉर्केला गोलंदाजी देत ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण, अनुभवाच्या कमतरतेमुळे त्याच्या टप्प्यात सातत्याचा अभाव दिसला. त्यामुळे वेग असूनही त्याला विकेट घेता आली नाही. पहिला गडी २५ धावांवर तंबूत पाठवल्यानंतर दुसर्‍या गड्यासाठी द. आफ्रिकेला १६३धावा होण्याची वाट पहावी लागली. रबाडाने पुजाराला बाद करत ही जोडी फोडली.

पुजाराने आपले २२वे कसोटी अर्धशतक लगावताना ५८ धावा केल्या. मयंक अगरवालने आपले दुसरे कसोटी शतक ठोकताना १०८ धावा केल्या. परंतु, शतकानंतर अधिक वेळ तो खेळपट्टीवर टिकला नाही. चौथ्या स्थानावर आलेल्या कर्णधार कोहलीने संथ सुरुवातीनंतर वेग पकडताना आपले २३वे कसोटी अर्धशतक ठोकताना नाबाद ६३ धावा जमवल्या.

भारत व दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी आपल्या संघात प्रत्येकी एक बदल केला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असल्याचे हेरून भारताने फलंदाज हनुमा विहारीला वगळून वेगवान गोलंदाज उमेश यादवला खेळविले तर पाहुण्यांनी ऑफस्पिनर डॅन पिदला वगळून ऍन्रिक नॉर्केला कसोटी पदार्पणाची संधी दिली.
धावफलक
भारत पहिला डाव ः मयंक अगरवाल झे. ड्युप्लेसी गो. रबाडा १०८, रोहित शर्मा झे. डी कॉक गो. रबाडा १४, चेतेश्‍वर पुजारा झे. ड्युप्लेसी गो. रबाडा ५८, विराट कोहली नाबाद ६३, अजिंक्य रहाणे नाबाद १८, अवांतर १२
एकूण ८५.१ षटकांत ३ बाद २७३
गोलंदाजी ः व्हर्नोन फिलेंडर १७-५-३७-०, कगिसो रबाडा १८.१-२-४८-३, ऍन्रिक नॉर्के १३-३-६०-०, केशव महाराज २९-८-८९-०, सेनुरन मुथूसामी ६-१-२२-०, डीन एल्गार २-०-११-०