टीम इंडिया ‘चॅम्पियन’

0
2

भारतीय संघाने दुबईतील ‘चॅम्पियन्स करंडक 2025′ चे जेतेपद ऐतिहासिक कामगिरी करत पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात 4 बळी व एक षटक राखत पराभव केला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने 49 षटकांत 252 धावांचे लक्ष्य गाठले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 49व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. या सामन्यात 76 धावा फटवणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला.

या विजयासह टीम इंडिया चॅम्पियन्स चषक तिसऱ्यांदा पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. यासह भारताने गेल्या 10 महिन्यांत दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे 9 महिन्यांत दुसरे आयसीसी जेतेपद आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी त्याने टी-20 विश्वचषकही जिंकला होता.

भारताने न्यूझीलंडचा 4 गडी व 6 चेंडू शिल्लक ठेवून पराभव करत आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडचा डाव 7 बाद 251 असा रोखल्यानंतर भारताने 49 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा करत विजेतेपदाला गवसणी घातली. फिरकी गोलंदाज खऱ्या अर्थाने या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले. त्यांनी तब्बल 38 षटके गोलंदाजी करताना केवळ 144 धावा देताना 5 गडी बाद केले.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला वेगवान सलामीची आवश्यकता होती. रोहित व गिल यांनी भारताला 10 षटकांत बिनबाद 64 अशी मजल मारून दिली. या दोघांनी संघाला 105 धावांची सलामी दिली. यानंतर किवींच्या फिरकीपटूंनी टिच्चून मारा केला. वरुणची मिस्टरी किंवा कुलदीपचा मनगटी जादू असलेला एकही खेळाडू संघात नसताना सेंटनर, ब्रेसवेल व रवींद्र यांनी टीम इंडियाला जखडून ठेवले. त्यांच्या फिरकीपटूंना भारताच्या डावापेक्षा अधिक मदत खेळपट्टीकडून मिळाली. भारतीय गोलंदाजांना सरासरी केवळ 2 डिग्री वळण मिळत होते. तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 3.4 डिग्री वळण मिळवत लगाम घातला. त्यांच्या फिरकीपटूंनी 35 षटके गोलंदाजी करताना 152 धावा देत 5 बळी मिळवले. कोहली ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर केवळ 1 धाव करून पायचीत झाला तर स्थिरावलेल्या रोहितने पुढे सरसावत खेळण्याच्या नादात आपली विकेट बहाल केली. त्यामुळे भारताची 3 बाद 122 अशी स्थिती झाली. अर्धशतकानजिक असताना अय्यर वैयक्तिक 48 धावांवर बाद झाला तर अक्षर पटेलने ब्रेसवेलच्या शेवटच्या षटकात आवश्यक नसताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट फेकली. त्यामुळे टीम इंडिया 5 बाद 203 अशी संकटात सापडली होती. राहुलने समयोचित खेळ करत नाबाद 34 धावा केल्या.

संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना पंड्या बाद झाला. जडेजाने यानंतर राहुलसह विजयाची औपचारिकता पूर्ण केली. तत्पूर्वी, टीम इंडियाचा नाणेफेक गमावण्याचा सिलसिला या सामन्यातही सुरूच राहिला. न्यूझीलंडचा कर्णधार सेंटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. विल यंग व रचिन रवींद्र यांनी न्यूझीलंडला अवघ्या 7.5 षटकांत 57 धावांची खणखणीत सलामी दिली. या द्वयीने शमी व पंड्या या जलदगती दुकलीला लक्ष्य केले. त्यामुळे कर्णधार रोहितने वरुणला सहाव्या षटकातच गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्याने कर्णधार रोहितचा विश्वास सार्थ ठरवताना आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर रवींद्रची विकेट जवळपास मिळवली होती. परंतु, सीमारेषेवर श्रेयस अय्यरने रवींद्रचा वैयक्तिक 29 धावांवर झेल सोडला. यापूर्वी महंमद शमीने स्वतःच्या गोलंदाजीवर रवींद्रला वैयक्तिक 28 धावांवर जीवदान दिले होते. अय्यरच्या सुटलेल्या झेलानंतर निराश न होताच याच षटकात यंगला पायचीत करत वरुणने ही धोकादायक ठरत असलेली जोडी फोडली. पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर रोहितने कुलदीपला गोलंदाजीस आणले. त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्रचा त्रिफळा उडवला. कुलदीपने यानंतर आपल्या पुढच्याच षटकात धोकादायक विल्यमसनला वैयक्तिक 11 धावांवर स्वतःच्या गोलंदाजीवर झेलताना त्यांची 3 बाद 75 अशी स्थिती केली. टॉम लेथम व मिचेल यांनी सावध खेळ करत संघाचे शतक फलकावर लगावले. लेथम सलग दुसऱ्या सामन्यात जडेजाच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका मारण्याच्या नादात पायचीत झाला. साखळी फेरीतही त्याने ‘रिव्हर्स स्वीप’च्या फटका मारण्याच्या प्रयत्नात जडेजाला आपली विकेट बहाल केली होती. यावेळेस पारंपरिक स्विप मारताना त्याला जडेजाने पायचीतच्या सापळ्यात अडकवले. ग्लेन फिलिप्सने उपयुक्त 34 धावांचे योगदान दिले. खेळपट्टीवर स्थिरावलेला असताना वरुणने त्याचा काटा काढला. डॅरेल मिचेल वैयक्तिक 63 धावांवर बाद झाला. त्याने वनडेतील आपले आठवे अर्धशतक झळकावले. फिरकी गोलंदाजांना खेळणे कठीण बनत असताना मायकल ब्रेसवेल याने शमी व हार्दिकला टार्गेट केले. त्याने आपले पहिले वनडे अर्धशतक झळकावताना नाबाद 53 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत किवी संघाने 50 धावा केल्या. भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 12 षटके गोलंदाजी करताना तब्बल 104 धावांची खैरात करताना केवळ 1 बळी मिळविला. रोहित शर्मा याला 76 धावांसाठी सामनावीर पुरस्कार प्राप्त झाला तर स्पर्धेत 263 धावा करताना 3 बळी घेतलेला रचिन रवींद्र स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

धावफलक
न्यूझीलंड ः विल यंग पायचीत गो. वरुण 15, रचिन रवींद्र त्रि. गो. कुलदीप 37 (29 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार), केन विल्यमसन झे. व गो. कुलदीप 11, डॅरेल मिचेल झे. रोहित गो. शमी 63, टॉम लेथम पायचीत गो. जडेजा 14, ग्लेन फिलिप्स त्रि. गो. वरुण 34, मायकल ब्रेसवेल नाबाद 53 (40 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार), मिचेल सेंटनर धावबाद कोहली-राहुल 8, नॅथन स्मिथ नाबाद 0, अवांतर 16, एकूण 50 षटकांत 7 बाद 251
गोलंदाजी ः महंमद शमी 9-0-74-1, हार्दिक पंड्या 3-0-30-0, वरुण चक्रवर्ती 10-0-45-2, कुलदीप यादव 10-0-40-2, अक्षर पटेल 8-0-29-0, रवींद्र जडेजा 10-0-30-1
भारत ः रोहित शर्मा यष्टिचीत लेथम गो. रवींद्र 76 (83 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार), शुभमन गिल झे. फिलिप्स गो. सेंटनर 11, विराट कोहली पायचीत गो. ब्रेसवेल 1, श्रेयस अय्यर झे. रवींद्र गो. सेंटनर 48, अक्षर पटेल झे. ओरुर्क गो. ब्रेसवेल 29, केएल राहुल नाबाद 34, हार्दिक पंड्या झे. व गो. जेमिसन 18, रवींद्र जडेजा नाबाद 9, अवांतर 8, एकूण 49 षटकांत 6 बाद 254
गोलंदाजी ः काईल जेमिसन
5-0-24-1, विल ओरुर्क 7-0-56-0, नॅथन स्मिथ 2-0-22-0, मिचेल सेंटनर 10-0-46-2, रचिन रवींद्र 10-1-47-1, मायकल ब्रेसवेल 10-1-28-2, ग्लेन फिलिप्स 5-0-31-0