>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ०-२ अशी गमावूनही टीम इंडियाने काल मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. भारताचे ११६ रेटिंग गुण असून न्यूझीलंड संघाचे सहा गुण कमी आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ १०८ गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटींतील चार डावांत केवळ ३८ धावा करूनही विराट कोहलीच्या दुसर्या स्थानाला धोका पोहोचलेला नाही. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम ब्लंडेल, भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ व किवींचा मध्यमगती गोलंदाज काईल जेमिसन यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. मालिकेत एका अर्धशतकासह ११७ धावा जमवलेल्या ब्लंडेल याने २७ स्थानांची उडी घेत ४६वा क्रमांक प्राप्त केला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध २०१८ साली कसोटी पदार्पण केल्यानंतरची आपली पहिलीच मालिका खेळलेल्या पृथ्वी शॉ याने ख्राईस्टचर्च कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या ५४ धावांची अर्धशतकी खेळीच्या बळावर १७ स्थानांची उडी घेत ७६व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ फलंदाजांमध्ये अव्वल आहे. कोहलीपेक्षा त्याचे २५ गुण अधिक आहेत. ऑस्ट्रेलियाचा उगवता स्टार मार्नल लाबुशेन तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने एका स्थानाची सुधारणा करत कोहलीच्या दुसर्या स्थानाला धोका निर्माण केला आहे. स्पर्धावीर ठरलेला न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊथी याने ‘टॉप पाच’मध्ये प्रवेश करताना चौथा क्रमांक मिळविला आहे. जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी चार क्रमांकांची झेप घेतली आहे. बुमराह सातव्या व बोल्ट नवव्या स्थानी पोहोचला आहे. सर्वाधिक फायदा उंचपुर्या काईल जेमिसन याला झाला आहे. त्याने ८०व्या स्थानावरून थेट ४३वा क्रमांक गाठला आहे. अष्टपैलूंमध्ये साऊथी याने नवव्या वरून दहाव्या स्थानी अवनती झाली आहे. या यादीत जेमिसनने २६ स्थानांची सुधारणा करत २२वा क्रमांक प्राप्त केला आहे.