
>> बांगलादेशवर १७ धावांनी विजय
रोहित शर्माच्या टीम इंडियाने बांगलादेशचा १७ धावांनी पराभव करून निदाहास तिरंगी टी-२० मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सामनावीर जरी कप्तान रोहित शर्मा ठरला असला तरी या विजयाचा खरा शिल्पकार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ठरला. त्याने आपल्या चार षटकांत केवळ २२ धावा देत ३ गडी बाद केले.
या सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले होते. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना वीस षटकांत १५९ धावांत रोखले. सुंदरव्यतिरिक्त युजवेंद्र चहलने किफायतशीर मारा करताना ४ षटकांत २१ धावांत १ गडी बाद केला. मध्यमगती गोलंदाज विजय शंकरने केवळ २८ धावा मोजून आपला कोटा पूर्ण केला.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावांपर्यंत मजल मारली.
दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला या सामन्यात सूर गवसला. त्याने ६१ चेंडूत ८९ धावा केल्या. तर रैनानेही झटपट ४७ धावा करुन त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशकडून रुबल हुसेनने दोन फलंदाजांना बाद केले. चार सामन्यांतून ३ विजय व १ पराभवासह भारताचे ६ गुण झाले असून स्पर्धेतील इतर दोन संघ असलेल्या श्रीलंका तसेच बांगलादेशचे प्रत्येकी २ गुण आहेत.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा धावबाद ८९ (६१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार), शिखर धवन त्रि. गो. रुबेल ३५ (२७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), सुरेश रैना झे. सौम्य सरकार गो. रुबेल ४७, (३० चेंडू, ५ चौकार, २ षटकार), दिनेश कार्तिक नाबाद २, अवांतर ३, एकूण २० षटकांत ३ बाद १७६
गोलंदाजी ः अबू हैदर ४-०-४३-०, नझमूल इस्लाम ४-०-२७-०, रुबेल हुसेन ४-०-२७-२, मुस्तफिझुर रहमान ४-०-३८-०, मेहदी हसन मिराझ ३-०-३१-०, महमुदुल्ला १-०-९-०
बांगलादेश ः तमिम इक्बाल त्रि. गो. सुंंदर २७ (१९ चेंडू, ४ चौकार, १ षटकार), लिट्टन दास यष्टिचीत कार्तिक गो. सुंदर ७, सौम्य सरकार त्रि. गो. सुंदर १, मुश्फिकुर रहीम नाबाद ७२ (५५ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), महमुदुल्ला झे. राहुल गो. चहल ११, सब्बीर रहमान झे. रैना गो. सिराज २७ (२३ चेंडू, २ चौकार, १ षटकार), मेहदी मिराझ झे. रैना गो. सिराज ७, अबू हैदर नाबाद ०, अवांतर ७, एकूण २० षटकांत ६ बाद १५९
गोलंदाजी ः मोहम्मद सिराज ४-०-५०-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२२-३, शार्दुल ठाकूर ४-०-३७-१, युजवेंद्र चहल ४-०-२१-१, विजय शंकर ४-०-२८-०