>> न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज
भारत व न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळविला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली असून आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत आज विजय मिळवावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारून दिली होती. परंतु, गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करणे शक्य झाले नव्हते. शार्दुल ठाकूरच्या एककल्ली मार्याला किवी संघाने या सामन्यात लक्ष्य केले होते. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची ‘गुगली’ व ‘लेगस्पिन’ चेंडू पारखून किवी फलंदाजांनी त्याची गोलंदाजी झोडपून काढली होती. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी काहीअंशी समाधानकारक कामगिरी केली होती. परंतु, लौकिकाला साजेसे प्रदर्शन करणे या दोघांना जमले नव्हते. कोहलीने पहिल्या लढतीत केदार जाधवला खेळविले होते. इतर गोलंदाजांना झोडपले जात असताना जाधवला किमान एक-दोन षटकांसाठी गोलंदाजी देणे अपेक्षित होते. परंतु, असे झाले नाही. यामागील कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.
मालिकेतील आव्हानाच्या दृष्टीने आजचा सामना महत्त्वाचा असल्याने भारताला खेळपट्टीचे स्वरुप ओळखून सर्वोत्तम संघ उतरावा लागणार आहे. त्यामुळे मध्यम वेगवान असलेल्या शार्दुल ठाकूरपेक्षा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला खेळविणे भारताच्यादृष्टीने सोयीचे ठरू शकते. सैनीच्या तुलनेत शार्दुल बर्यापैकी फलंदाजी करत असल्याने या परिस्थितीत फलंदाजीतील खोली काहीअंशी कमी होणार आहे. धावगतीला लगाम घालण्यासाठी कुलदीपऐवजी युजवेंद्र चहलच्या पारंपरिक लेगस्पिन गोलंदाजीला आज पसंती मिळू शकते. न्यूझीलंड संघाचा विचार केल्यास त्यांनी लेगस्पिनर ईश सोधी याला ‘अ’ संघाकडून खेळण्यासाठी मुक्त केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता नाही. त्याच्याजागी ६ फूट ८ इंच उंची लाभलेला मध्यमगती गोलंदाज काईल जेमिसन आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. स्कॉट कुगलाईन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने जेमिसनचे पदार्पण जवळपास नक्की मानले जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने आपला शानदार खेळ दाखवत टी-ट्वेंटीमधील व्हाईटवॉश इतिहास झाल्याचे दाखवून दिले होते. रॉस टेलर, हेन्री निकोल्स व कर्णधार टॉम लेथम यांची परिपक्व खेळी संघाला प्रोत्साहन देणारी ठरली होती. आज पुन्हा एकदा या कामगिरीची पुनरावृत्ती करून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.