>> रोमहर्षक निर्णायक लढतीत न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात
>> बुमराह सामनावीर व मालिकावीर
पावसाच्या व्यत्ययात खेळविण्यात आलेल्या प्रत्येकी ८ षट्कांच्या निर्णायक व शेवटच्या सामन्यात गोलंदाजांच्या सूत्रबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात करीत टी-२० मालिका २ -१ अशी जिंकली. भारतासाठी हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला. कारण त्यांनी पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध टी -२० मालिका विजय जिंकण्याचा पराक्रम केला. टीम इंडियाने वन-डे मालिकाही जिंकली होती.
जसप्रीत बुमराहची सामनावीर व मालिकावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
जोरदार पावसामुळे हा सामना उशिराने प्रत्येकी ८ सामन्यांचा खेळविण्यात आला. भारताकडून मिळालेल्या ६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कीविज संघाला ६ गड्यांच्या मोबदल्यात ६१ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना एका पाठोपाठ एक असे धक्के देतानाच मोठे फटके खेळण्यापासून रोखले. दुसर्या सामन्यात शतक झळकावणारा कॉलिन मुनरोही या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. भुवनेश्वरने उडवला गप्टीलचा (१) त्रिफळा उडवित न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. बुमराहने धोकादायक फलंदाज कोलिन मुन्रोचा (७) अडथळा दूर करीत भारताला महत्त्वपूर्ण दुसरे यश मिळवून दिले. लगेच केन विल्यमसनही (८) पांड्याच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धावचित झाल्याने कीविज संघ बॅकफूटवर गेला. ग्लेन फिलिप्स (११) आणि कोलिन डी ग्रँडहोम (नाबाद १७) यांनी काहीशी आश्वासक फलंदाजी करीत कीविजच्या विजयाच्या अपेक्षा वाढविल्या. परंतु महत्त्वाच्या क्षणी युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी टिच्चून मारा करीत टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पहिला वहिला टी -२० मालिका विजय मिळवून दिला. भारतातर्फे बुमराहने २, तर भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर टीम इंडियाने ५ गडी गमावत ६७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. रोहित शर्मा (८) व शिखर धवन (६) हे दोघे सलामीवर तसेच श्रेयस अय्यर (६) अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली (१३), मनिष पांडे (१७) आणि हार्दिक पांड्या (नाबाद १४) यांनी उपयुक्त फलंदाजी करीत न्यूझीलंडसमोर ६८ धावांचे लक्ष्य उभे केले होते. न्यूझीलंडतर्फे टिम साऊदी व ईश सोधी यांनी प्रत्येकी २ तर ट्रेंट बौल्टने १ गडी बाद केला.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. मिचेल सेंटनर गो. टिम साऊदी ८, शिखर धवन झे. मिचेल सेंटनर गो. टिम साऊदी ६, विराट कोहली झे. ट्रेंट बौल्ट गो. ईश सोधी १३, श्रेयस अय्यर झे. मार्टिन गप्टिल गो. ईश सोधी ६, मनिष पांडे झे. कोलिन डी ग्रँडहोम गो. ट्रेंट बौल्ट १७, हार्दिक पांड्या नाबाद १४, महेंद्रसिंह धोनी नाबाद ०. अवांतर ः ३. एकूण ८ षट्कांत ५ बाद ६७. गोलंदाजी ः ट्रेंट बौल्ट २/०/१३/१, मिचेल सेंटनर २/०/१६/०, टिम सा ऊदी २/०/१३/२, ईश सोधी २/०/२३/२.
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल त्रिफळाचित भुवनेश्वर कुमार १, कोलिन मुन्रो झे. रोहित शर्मा गो. जसप्रीत बुमराह ७, केन विल्यमसन धावचित (हार्दिक पांड्या) ८, ग्लेन झे. शिखर धवन गो. कुलदीप यादव ११, कोलिन डी ग्रँडहोम नाबाद १७, हेन्री निकोल्स झे. श्रेयस अय्यर गो. जसप्रीत बुमराह २, टॉम ब्रुस धावचित (हार्दिक पांड्या) ४, मिचेल सेंटनर नाबाद ३. अवांतर ः ८. एकूण ८ षटकांत ६ बाद ६२ धावा. गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार २/०/१८/१, जसप्रीत बुमराह २/०/९/२, युजवेंद्र चहल २/०/८/०, कुलदीप यादव १/०/१०/१, हार्दिक पांड्या १/०/११/०.