>> न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामना आज
पहिले तिन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातलेल्या टीम इंडियाने संधी न मिळालेल्या काही खेळाडूंनी आज न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात उतरवण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे तिसर्या सामन्यात विजयाच्या दारातून पराभवाची नामुष्की ओढविलेला यजमान न्यूझीलंडचा संघ सामना जिंकून पिछाडी कमी करण्यासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.
टीम इंडियाचा संघ आजच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी नवदीप सैनीला उतरवू शकतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून मोहम्मद शमीने भारताकडून मागील १८ महिन्यांत २००च्या आसपास षटके टाकली आहेत. त्यामुळे त्याला उसंत देण्याची गरज आहे. कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर यांनादेखील न्यूझीलंडमधील वातावरणाचा अनुभव मिळवून देणे गरजेचे आहे. या दोघांना संधी द्यायचे ठरविल्यास रवींद्र जडेजा व युजवेंद्र चहल या दोघांना विश्रांती द्यावी लागणार आहे. परंतु, ही शक्यता फार कमी आहे. त्यामुळे किमान आजच्या सामन्यासाठी तरी या दोघांपैकी केवळ एकालाच संधी अपेक्षित आहे. न्यूझीलंड संघात कॉलिन डी ग्रँडहोमची जागा डॅरेल मिचेल घेणार आहे.
न्यूझीलंडच्या मिचेल सेंटनरसाठी वेलिंग्टनचे हे मैदान लाभदायी ठरले असून ५ सामन्यांत ६ पेक्षा कमीच्या इकॉनॉमीने त्याने ९ बळी या मैदानावर घेतले आहेत. मालिकेत आत्तापर्यंत फारशी कमाल त्याला करता आली नसली तरी या सामन्याद्वारे सूर मिळविण्याचा त्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडच्या सेंटनरप्रमाणे भारताच्या जसप्रीत बुमराहलादेखील आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. तिसर्या टी-ट्वेंटीमध्ये केन विल्यमसन त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता. त्यामुळे आपल्या टी-ट्वेंटी कारकिर्दीत केवळ चौथ्यांदा बुमराहच्या चार षटकांत ४० पेक्षा जास्त धावा प्रतिस्पर्धी संघाला काढणे शक्य झाले होते. ‘सुपर ओव्हर’मध्येेदेखील बुमराहला आपली दिशा राखणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे या ‘धुलाई’चे उट्टे काढण्यासाठी तो सज्ज नक्कीच झालेला असेल.